पोलीस माझे एन्काऊंटर करण्याच्या तयारीत; मला सुरक्षा द्या – जिग्नेश मेवाणी

Jignesh_Mevani

टीम महाराष्ट्र देशा- पोलीस अधिकारी माझ्या एन्काऊंटर करण्याची चर्चा करत असल्याने मला सुरक्षा पुरवा अशी मागणी मागणी गुजरातचे दलित नेते आणि आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ADR Police & Media या व्हॉट्स अॅप ग्रुपवरची चर्चा व्हायरल झाल्यानंतर मेवाणी यांनी आपल्या बचाव आणि सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे.

काय आहे प्रकरण ?
ADR Police & Media या व्हॉट्स अॅप ग्रुपवर दोन व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. एका व्हिडिओत नेत्याचा पोशाख घातलेला एक माणूस पोलिसांना मारतो आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या एका एन्काऊंटरप्रकरणी करण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना दिसत आहेत. हे दोन्ही व्हिडिओ अहमदाबाद ग्रामीणचे डीएसपी यांच्या मेसेजनंतर अपलोड करण्यात आले आहेत. जी माणसे पोलिसांचे बाप असल्याचा दावा करतात, पोलिसांना ‘लखोटा’ असे चिडवतात आणि पोलिसांचा व्हिडिओ काढतात त्यांच्यासोबत असेच घडते. गुजरात पोलीस; असे या मेसेजमध्ये लिहिण्यात आले असल्याचेही जिग्नेश मेवाणी यांनी म्हटले आहे.या मेसेजला थम्स अप इमोजीने उत्तर देत अहमदाबाद ग्रामीण एसपीनेही फॉलो केले होते. तसेच हा मेसेज इतर ग्रुप्सवरही फॉरवर्ड करण्यात आला.

दरम्यान १८ फेब्रुवारीला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये जिग्नेश मेवाणी पोलिसांशी वाद घालताना दिसत आहेत. जिग्नेश मेवाणींना अहमदाबाद बंद सुरु होण्याआधी अटक करण्यात आली होती त्यावेळी मेवाणी पोलिसांना उद्देशून म्हटले होते की यह तुम्हारे बाप की जगह नहीं. तसेच साध्या वेशातील पोलिसांना लखोटा असे म्हणत जिग्नेश मेवाणींनी त्यांची खिल्ली उडवली होती. मात्र काही दिवसातच दोन व्हिडिओ व्हायरल झाले. ज्यानंतर जिग्नेश मेवाणी यांनी सुरक्षेची मागणी केली आहे.

या मेसेजचा अर्थ चुकीच्या पद्धतीने काढला गेल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ही धमकीही नव्हती किंवा खासगी मेसेजही नव्हता. मात्र हा मेसेज पोहचल्यानंतर जिग्नेश मेवाणी यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच पोलीस माझे एन्काऊंटर करण्याच्या तयारीत आहेत असा आरोपही केला आहे.