पॉलीश करण्याच्या बहाण्याने दागिने लांबविले

आयकर विभाग

रत्नागिरी  : दागिने पॉलिश करायच्या बहाण्याने विवाहितेचे २ तोळ्यांचे दागिने लांबवल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुप्रिया दीपक चव्हाण (३९,रा. खेडेकरवाडी, रत्नागिरी) यांनी याबाबत शहर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार दुपारी १२.३० वा. च्या सुमारास त्या घरी असताना दोघेजण त्यांच्या घरी आले.

आम्ही दागिने पॉलिश करणारे असून, तुमचे दागिने पॉलिश करायचे आहेत का, अशी विचारणा त्यांनी केली. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सुप्रिया चव्हाण यांनी हातातील तांब्याची अंगठी त्यांच्याकडे दिली. ती अंगठी त्यांनी पॉलिश करून दिल्यावर त्यांनी आपले मंगळसूत्र आणि कानातले पॉलिश करण्यासाठी त्या दोघांकडे दिले. त्यांनी ते सोन्याचे दागिने एका डब्यात टाकून त्यात तुरटी आणि हळद टाकली. त्यानंतर चव्हाणांना गरम पाणी आणण्यास सांगितले. त्या घरातून पाणी आणण्यासाठी गेल्याची संधी साधत, त्या दोन्ही भामट्यांनी आपल्याकडील खोटे दागिने डब्यात टाकून त्यातील सोन्याचे दागिने आपल्या बॅगेत टाकले.

दरम्यान सुप्रिया चव्हाण गरम पाणी घेउन बाहेर आल्यावर त्यांनी ते पाणी डब्यात टाकून दहा मिनिटांनी दागिने धुऊन घेण्यास सांगितले व दुचाकीवरून पळ काढला. काही वेळाने चव्हाणांनी डब्यातील दागिने बाहेर काढले असता त्यांना ते आपले सोन्याचे दागिने नसल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना सांगितले.