जेऊरच्या उड्डाणपूलाची चाळणी

uddanpool

गौरव मोरे (जिल्हाप्रतिनिधी सोलापूर) –  करमाळा तालुक्यातील जेऊर येथील बायपास तसेच उड्डाणपूलाची दुरवस्था झाली असून नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. उड्डाणपूल निर्मितीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. रस्ताच्या तसेच उड्डाणपूलाच्या निर्मितीसाठी निकृष्ट दर्जाची सामग्री वापरण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सोलापूर जिल्हातील जेऊर हे लोहमार्गावरील महत्त्वाचे स्टेशन असून ,१५ हजार लोकसंख्याचे गाव आहे. जेऊर परिसरात १५ ते २० लहान गावे आहेत.या परिसरातील नागरिक जेऊरला कामानिमित्त रोज येतात.जेऊर हे या परिसरातील एक मुख्य रेल्वे स्टेशन आहे.  गावातून लोहमार्ग गेल्याने तसेच वाहतूकीची होणारी कोंडी टाळण्यासाठी राज्यसरकार आणि रेल्वे प्रशासन यांच्या भागीदारीने जेऊर बायपास ला लोहमार्गावर करोडो रूपये खर्चून उड्डाणपूल बांधण्यात आला आहे.

jeur

वाहतूकीची कोंडी तसेच रेल्वे फाटकामुळे होणारे अपघात थांबवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे फाटक पाच वर्षांपुर्वी बंद केले त्यामुळे जेऊर गावात येणारी सर्व वाहतूक आणि टेंभूर्णी-नगर राष्ट्रीय महामार्गावरील सर्व वाहतूक उड्डाणपूलावरून होत आहे परंतु जड वाहतूक आणि गेल्या चार- पाच वर्षांपासून रस्ता पूर्णपणे दुरूस्त न केल्याने जेऊरचा उड्डाणपूल खचला आहे.

टेंभूर्णी कडून करमाळ्याकडे जाणाऱ्या बाजूस उड्डाणपूल रस्तापासून खाली खचला असून करमाळा कडून टेंभूर्णीकडे जाणाऱ्या बाजूस मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. सध्यातरी एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतूकीची कोंडी होत आहे गाड्यांचे लांबच्या लांब रांगा लागत आहेत.

जेऊर उड्डाणपूलावरील सिमेंट निघाल्यामुळे उड्डाणपूलावरील सळया बाहेर आलेले आहेत. ये जा करणाऱ्या वाहनांमध्ये त्या सळया घुसू नये म्हणून वाहन चालक ते खड्डे चुकविताना दिसून येत आहे,मोठ-मोठे खड्ड्यांमुळे वाहन धारकांना कसरत करावी लागत आहे. छोटे-मोठे अपघात घडत आहेत. उड्डाणपूलावरील संरक्षण कठडे आणि स्टील चे बार तुटल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
उड्डाणपूलाची दुरूस्ती लवकरात लवकर करण्याची गरज आहे अन्यथा मोठे अपघात होण्याची शक्यता आहे.

जेऊर उड्डाणपूलाची फक्त खड्डे बुजवून उपयोग होणार नसून उड्डाणपूल पूर्णपणे दुरूस्त करावा लागेल अन्यथा टेंभूर्णी-नगर ला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे.जेऊर उड्डाणपूलावर  खड्डे नसून, खड्ड्यात रस्ता आहे.वाहन धारकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात.खचलेल्या  उड्डाणपूलावर वाहने चालविताना समोरून किंवा पाठीमागून कोण येऊन धडकेल याचा काही नेम नाही. तसेच हा उड्डाणपूलाची  डागडुजी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी जेऊर व्यापारी संघटनेनी केली आहे.