के.जी.बोपय्या यांच्या नियुक्तीवर कॉंग्रेसचा आक्षेप

नवी दिल्ली – विराजपेठ येथील भाजपा आमदार के.जी.बोपय्या यांची कर्नाटक विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज होणाऱ्या महत्वपूर्ण विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी बोपय्या विधानसभेचे अध्यक्ष असतील. कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी शुक्रवारी दुपारी बोपय्या यांना विधानसभा अध्यक्षपदाची शपथ दिली. आज दुपारी चार वाजता विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे.

मात्र तत्पूर्वी के.जी.बोपय्या यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत कॉंग्रेसने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचे दार थोटावले आहे. कॉंग्रेस आणि जेडीएसने बोपय्या यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवला आहे. याविरोधात कॉंग्रेसने सुप्रीम कोर्टात दाद मागितली. विधासभा अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द वादग्रस्त असल्याने त्यांची नियुक्ती करण्यात येऊ नये असं कॉंग्रेसने म्हंटले आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

दरम्यान भाजपकडे पूर्ण बहुमत नसताना देखील राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावल्याने काँग्रेसने या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने भाजपला आज ४ वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.