भाजप प्रवेशाबाबत जयकुमार गोरेंनी अफवांचे केले खंडन

टीम महाराष्ट्र देशा : साताऱ्यातील माणखटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी नुकतीच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेतली. ही भेट राजकीय वर्तुळात चांगलीच गाजली.आता काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटी मागचे कारण सांगितले आहे. ‘मी माझ्या मतदारसंघातील पाणी प्रश्नाबाबत महाजन यांच्या भेटीला गेलो होतो,’ असे स्पष्टीकरण देत जयकुमार गोरे यांनी भाजप पक्ष प्रवेशाबाबतच्या वृत्ताचे खंडन केले.

याबाबत जयकुमार गोरे म्हणाले की, गिरीश महाजन यांच्यासोबतची भेट माझ्या मतदारसंघातील पाणी प्रश्नाबाबत होती. मी कालही काँग्रेस पक्षात होतो आणि उद्याही राहील. त्यामुळे भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त हे खोटे आहे.

दरम्यान जयकुमार गोरे यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. या भेटी वेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे जयकुमार गोरे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या बातमीने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. मात्र गोरे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाने तूर्तास तरी भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.