जयदत्त क्षीरसागर शिवसेनेच्या वाटेवर ? , रात्री उशिरा मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे बडे नेते आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी आपले बंधू भारतभूषण क्षीरसागर यांच्यासोबत काल रात्री उशिरा मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. क्षीरसागर मातोश्रीच्या भेटीला पोहोचताच बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष या भेटीकडे लागले आणि चर्चेला उधाण आले, तर्क वितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, परवा बीडमध्ये राष्ट्रवादीवर नाराज असलेले बीड जिल्ह्यातील बडे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेऊन आपला निर्णय जाहीर केला. शिवसेना-भाजप उमेदवारांना निवडून आणा अशी घोषणा देत जयदत्त क्षीरसागर, त्यांचे बंधू नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्यासह समर्थक युती चार उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या कामाला लागले. अवघ्या काही तासात बीडमध्ये असलेले जयदत्त क्षीरसागर मुंबईमध्ये दाखल झाले आणि थेट मातोश्री वर जाऊन त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काही वेळानंतर क्षीरसागर मातोश्री बाहेर पडले.

या भेटीची बातमी बीड जिल्ह्यासह राज्यभरात वेगाने पसरली. या भेटीला मोठे राजकीय महत्व प्राप्त झाले. जिल्हाभरात तर्कवितर्क लावले गेले, मात्र ही भेट एक सदिच्छा भेट होती. महायुतीला पाठिंबा दिला आहे , शिवसेना यातील महत्त्वाचे घटक आहे, त्यांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या, एवढेच कारण असल्याचे क्षीरसागर यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र, या भेटीमागाचे खरे कारण अजून गुलदस्त्यातच आहे.