जयदत्त क्षीरसागर भाजपाला मदत करणार ?

बीड/प्रतिनिधी : राजकीय कारकीर्द पवारांच्या पारड्यात टाकणारे जयदत्त क्षीरसागर काही महिन्यांपासून राष्ट्रवादीवर प्रचंड नाराज आहेत. पुतण्या संदीप क्षीरसागराच्या आडून पावला पावलावर अपमान अवमान करणाऱ्या श्रेष्ठीचा बदला घेण्याची नामी संधी मिळालेले क्षीरसागर आपली निर्णायक मतं राष्ट्रवादी ऐवजी भाजपच्या पारड्यात टाकतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

बीडचं मोठं प्रस्थ म्हणून क्षीरसागर यांच्या कडे पाहिले जाते, ज्यांचा गेल्या चाळीस वर्षांपासून बीडच्या राजकारणावर दबदबा आहे. पवारांच्या विनंतीवरुन हे क्षीरसागर कुटूंब काँग्रेसमधून राष्ट्रवादीत दाखल झालं पण ओबीसी असल्यामुळे नेहमी त्यांना उपेक्षाच सहन करावी लागली.

मुंडे-क्षीरसागरांचे राजकीय सबंध डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीने क्षीरसागराना नेहमी हिनतेची वागणूक दिली. सत्तेत सहभागी करून घेतानाही नेहमी जेरीस आणले गेले. मंत्रिपद द्यायचं पण महत्व नसलेले अशी खेळी राष्ट्रवादी कडून खेळली जायची. दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे क्षिरसागर राष्ट्रवादीत आणि राष्ट्रवादी क्षीरसागरासोबत असायची पण मनाने नाही. अलीकडच्या काळात जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांची राजकीय महत्वाकांक्षा ओळखून राष्ट्रवादी ने संदीप क्षीरसागराना ताकद दिली.

क्षीरसागर कुटूंबामध्ये राजकीय कलहाची राळ उडाली, अन राष्ट्रवादीने या वादाला हवा दिली, गेल्या काही दिवसांपासून संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीच्या जेवढे जवळ गेले तेवढे जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीपासून दूर जाऊ लागले. संदीप क्षीरसागरांच्या आडून राष्ट्रवादी जयदत्त क्षीरसागरावर निशाणा साधू लागली. म्हणूनच मागचा पुढचा हिशोब चुकता करण्याची संधी क्षीरसागरांना मिळाली आहे .

आता होत असलेल्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा हे स्पष्ट होणार आहे की काकू-नाना आघाडी जर तुमच्या सोबत असेल तर आम्हाला ग्राह्य धरू नका म्हणत जयदत्त क्षीरसागर याची २२ मतं राष्ट्रवादीच्या नाही तर भाजपच्या पारड्यात जाऊ शकतील जयदत्त क्षीरसागर धनंजय मुंडेसाठी नाही तर पंकजा मुंडेच्या मदतीला धावून जातील असा राजकीय अभ्यासकांचा दावा आहे