दलितांना कस्पटासमान समजणाऱ्या उदयनराजेंना आम्ही राजे मानतच नाही : कवाडे

udayanraje bhosale

सातारा : एक जबाबदार लोकप्रतिनिधी असताना आपल्याला मते देऊन निवडून आणणाऱ्या दलित समाजाला कस्पटासमान समजणारे आणि अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल जाहीरपणे भाष्य करणारे खा. उदयनराजे भोसले आमच्या लेखी राजे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आमच्या लेखी राजे आहेत. राजाने राजासारखे वागावे. आम्ही त्यांचा सन्मान करतो पण उदयनराजेंना आम्ही राजे मानत नाही,’ अशा शब्दात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी शनिवारी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर थेट साताऱ्यातचं हल्लबोल केला आहे.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा मेळावा शनिवारी सातारा येथे झाला. या मेळाव्यास जयदीप कवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यानंतर कवाडे यांनी पत्रकारांशी बातचित केली. या पत्रकार परिषदेस जिल्हा कार्याध्यक्ष संजय गाडे, जिल्हा महासचिव संतोष सपकाळ, युवराज कांबळे आदी उपस्थित होते.

जयदीप कवाडे नेमकं काय म्हणाले ?

एक जबाबदार लोकप्रतिनिधी असताना आपल्याला मते देऊन निवडून आणणाऱ्या दलित समाजाला कस्पटासमान समजणारे आणि अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल जाहीरपणे भाष्य करणारे खा. उदयनराजे भोसले आमच्या लेखी राजे नाहीत. आम्ही त्यांना राजे मानतच नाहीत. आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर आहे. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने ‘छत्रपती’ आहेत. शिवाजी महाराज आणि बाबासाहेबच आमच्यासाठी राजे आहेत. राजाने राजासारखे वागावे. उदयनराजे हे संभाजी भिडेंना आदराने गुरुजी म्हणतात ही शोकांतिका आहे. ज्यांचा सांगलीच्या दंगलीत सहभाग आहे त्यांच्याबदद्दल जर उदयनराजे गौरवोद्गार काढत असतील तर ते चुकीचे आहे. भीमा कोरेगाव दंगलीत मिलींद एकबोटे आणि संभाजी भिडे यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकबोटे यांना अटक झाली. मात्र, भिडे दोषी असूनही त्यांना अटक नाही. त्याचे काय करणार, याचेही उत्तर भाजपा सरकारने द्यावे.