fbpx

राष्ट्रवादीत निष्ठेने काम करून पदरात काय पडलं ? : जयदत्त क्षीरसागर

टीम महाराष्ट्र देशा : बीड लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या प्रचाराचा चांगलाचं धडाका पाहिला मिळत आहेत तर आता केज येथे झालेल्या युतीच्या प्रचारसभेमध्ये राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली असून राष्ट्रवादीत निष्ठेने काम करून पदरात काय पडलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी क्षीरसागर म्हणाले की, मी राष्ट्रवादीला बाजूला सारले असून राष्ट्रवादाला जवळ केले आहे. जेथे जातो तेथे प्रामाणिकपणे आपले काम करत असतो. राष्ट्रवादी पक्षात देखील प्रामाणिकपणे काम केले मात्र पदरी काय पडले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर यावेळी क्षीरसागर यांनी मुंडे भगिनींच्या कामाचा आढावा दिला. त्याबाबत ते म्हणाले की , मुंडे भगिनींनी जातीपातीच्या पुढे जाऊन विकासाची कास धरली आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे बीड जिल्ह्यात विकास गंगा वाहत आहे. तसेच राज्यात आणि केंद्रात युतीचे सरकार असल्यामुळे भविष्यात पाणी प्रश्न सुटणार आहे. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे आमदार असून देखील बीड लोकसभा मतदार संघातून त्यांनी भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना पाठींबा दर्शिवला आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि क्षीरसागर यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून दुरावा निर्माण झाला आहे. धनंजय मुंडे यांच्या कामावर क्षीरसागर हे नाराज आहेत.त्यामुळे नाराज जयदत्त क्षीरसागर हे बीड लोकसभा मतदार संघामध्ये प्रीतम मुंडे यांच्या बाजूने प्रचार करत आहेत.