आता बाण हातात आहे, घड्याळ बंद पडलंय; जयदत्त क्षीरसागरांची राष्ट्रवादीवर टीका

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. तसेच अनेक नेते आपआपल्या मतदारसंघात सक्रीय झालेले दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नवीन रस्ते कामांच्या आणि गोरक्षनाथ टेकडी येथील रस्ते सुधारणा कामांच्या एकूण चार कोटी १७ लक्ष रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ झाला. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. लोकसभेच्या निवडणुकीत ढेकनमोहा परिसर मोठ्या ताकदीने उभा राहिला आहे. आता विधानसभेलाही तितक्याच ताकदीने उभे रहा असं आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

तसेच पुढे बोलताना परिवर्तनासाठी ताकदीने साथ द्या पुढच्या पिढीचे भविष्य घडवायचे असेल तर विकास कामे करणे गरजेची आहेत. आता बाण हातात आहे, घड्याळ बंद पडले आहे, असे सांगून विरोधकांनी दुसऱ्याच्या उट्या काढत बसू नयेत विकासाची कामे करून दाखवावीत असं आवाहन कार्यकर्त्यांना केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि शिवसैनिक हजर होते.

दरम्यान, जयदत्त क्षीरसागर हे यापूर्वी राष्ट्रवादीत होते. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत रावेश केला. त्यानंतर त्यांना मंत्रीही बनवण्यात आले आहे. आणि आता हेच क्षीरसागर राष्ट्रवादीवर टीका करताना दिसत आहेत.