नांदेड महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री पावडे बिनविरोध

Nanded Municipal Corporation

नांदेड :  नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या नगरसेविका जयश्री निलेश पावडे यांची बुधवारी (दि.१३) बिनविरोध निवड झाली. काॅंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी ठरवून दिलेल्या सव्वा-सव्वा वर्ष एकास संधी या समिकरणानुसार मोहिनी येवनकर यांनी ३० सप्टेंबर रोजी महापौर पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त जागेवर बुधवारी निवड प्रक्रिया पार पाडली. एकमेव अर्ज असल्यामुळे जयश्री पावडे यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी जिल्हाधिकारी तथा पिठासन अधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने आदींच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. विशेष सर्वसाधारण बैठकीमध्ये ऑनलाईन पध्दतीने ५८ नगरसेवकांनी उपस्थिती लावली होती. महापौरपदी निवड झाल्यानंतर जयश्री पावडे यांनी भुमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, ‘नांदेड शहरातील मुलभूत समस्यांकडे माझे लक्ष असेल. नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे. मलनिसरणाचा प्रश्न सोडविला जाणार आहे. तसेच पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड शहरातील रस्त्यांसाठी १५० कोटी रूपयांची मंजूरी दिली आहे. ही रस्त्यांची कामे लवकर पुर्ण व्हावीत यासाठी प्रयत्न करणार आहे.’

महत्त्वाचे म्हणजे मनपातील कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाचा प्रश्नही मार्गी लावण्याचे आवश्वासन त्यांनी दिले. यावेळी माजी महापौर मोहिनी रेवनकर, शैलजा स्वामी, सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या