शरद पवार हे लोकसभेत जावेत अशी आमची आणि देशातील नेत्यांची इच्छा – जयंत पाटील

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात सध्या देशातील विविध राजकीय पक्षांचे ऐक्य घडवून आणत आहेत. त्यामुळे ते आता राज्यसभेत असले तरी ते लोकसभेत गेल्यास अधिक वेगाने काम करतील अशी देशातील नेत्यांची आणि आमचीही इच्छा असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबईत केला.

पवारसाहेबांनी माढा लोकसभा लढवावी याबाबत आमचे ज्येष्ठ नेते त्यांच्याकडे मागणी करत आहेत. तर दुसरीकडे आज देशात मोदी आणि भाजपाच्या विरोधात वातावरण आहे.त्यामुळे पवारसाहेबांनी लोकसभेत जावे असे सर्वांना वाटते असल्याचे पाटील म्हणाले.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटप याविषयी चर्चा सुरू आहे. मित्र पक्ष एकत्र यावेत, असे आम्हाला वाटत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा लढवावी, याबाबत चर्चा सुरु आहे. त्यात जे प्रबळ असतील त्यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सांगत पाटील यांनी कोणाच्याही नावाचा आणि मतदार संघाचा उल्लेख केला नाही.

लोकसभा संपत आहे. त्यामुळे या बैठकीत लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे,शिवाय लोकसभेचे कॅपेन कसे करायचे यावर चर्चा होणार आहे. लोकसभा वेगवेगळ्या मतदारसंघात आखणी करत आहोत. उद्या पवार साहेब मुंबईत बैठक घेत आहेत, त्यात अनेक विषय मार्गी लागणार आहेत. आमचा आघाडीच्या संदर्भात बराच प्रश्न सुटला आहे. तीन-चार जागांचा विषय असला तरी येत्या चार दिवसांत तोही सुटेल असेही पाटील यांनी सांगितले.

देशात आणि राज्यात पवार साहेब सर्वांना एकत्र करून जातीनिशी लक्ष घालत आहेत.राज्यात भाजप-सेनेचा पराभव करण्यासाठी ज्यांची इच्छा आहे त्या सर्व पक्षांना बरोबर घेतले जाईल. इतर पक्षाच्या नेत्यांशी चर्चा आता होणार नाही भेटीगाठीचे पर्व संपले आहे. आता जागा वाटप यावरच चर्चा सुरु आहे. दरम्यान माझी आणि मनसेची आघाडीच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचे पाटील यांनी सांगितले.