मुंबई : अंमली पदार्थ पुरवठा प्रकरणात मुंबईतील प्रसिद्ध ‘मुच्छड पानवाला’चा मालक रामकुमार तिवारी याला अटक केल्यानंतर आता एनसीबीने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना देखील काल रात्री अटक केली आहे. यामुळे एकापाठोपाठ एक अशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या अडचणी वाढत आहेत.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचे आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील त्यांच्याशी संबंधित एका महिलेने आरोप करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली असतानाच नवाब मलिक यांच्या जावयाला देखील अंमली पदार्थांच्या कनेक्शनमध्ये अटक केली आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे. ‘नवाब मलिक यांच्या जावयाने गुन्हा केला असेल तर त्याची चौकशी केली जाईल. यामध्ये राज्य सरकारकडून कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही. मात्र, जावयाच्या गुन्ह्यासाठी सासऱ्याला जबाबदार धरणे योग्य नाही,’ असं पाटील म्हणाले आहेत. दरम्यान, या मंत्र्यांवर व नातेवाईकांवर होणाऱ्या आरोपांमुळे भाजपने मात्र आक्रमक भूमिका घेऊन टीकास्त्र सोडलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत मुंबई-पुण्यापेक्षा पेट्रोल महाग
- धनंजय मुंडेवरील आरोप गंभीर आहेत; पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वानुमते निर्णय घेऊ
- धनंजय मुंडेंवर माझा विश्वास – जयंत पाटील
- महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाची ४२८ पदाधिक-यांची मेगा कार्यकारिणी जाहीर
- ‘देशात शेतकऱ्यांचे राज्य पाहिजे मात्र भाजप भांडवलदारांच्या फायद्याचे कायदे करत आहे’