पक्षाचे काम न करणाऱ्या आणि केवळ पदे मिरवणाऱ्या व्यक्तींना जबाबदारीतून मुक्त करू : पाटील

jayant patil

टीम महाराष्ट्र देशा- आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मोठे फेरबदल केले जातील अशी शक्यता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. पाटील यांनी कार्यकर्त्यांना लिहलेले खुले पत्र लिहिले असून गुणी, कर्तृत्ववान आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या पुढील काळात प्राधान्याने पक्षात संधी आणि जबाबदारी दिली जाईल असं म्हटलं आहे. पक्षाचे विविध पातळ्यांवरील पदाधिकारी काय काम करतात याचे मूल्यमापन वेळोवेळी केले जाईन आणि गरज पडल्यास काम न करणाऱ्या आणि केवळ पदे मिरवणाऱ्या व्यक्तींना जबाबदारीतून मुक्त करण्याचाही पक्षाचा विचार आहे असा सूचक इशारा देखील पाटील यांनी या पत्रातून दिला आहे.

जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना लिहलेले खुले पत्र जसेच्या तसे
प्रिय बंधू-भगिनींनो,

दिनांक २९ एप्रिल २०१८ रोजी माझी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी आदरणीय पवार साहेबांनी, आपल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आणि क्रियाशील कार्यकर्त्यांनी निवड केली. या निमित्ताने राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधता यावा म्हणून मी हे पत्र आपल्याला सर्वांना लिहित आहे. प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर राज्यातील नागरिक व कार्यकर्त्यांनी माझे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सर्वांचे मनःपूर्वक आभार ! पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी आणि आपण सर्वांनी दाखवलेला विश्वास हा फार मोठा आहे. आपल्या सर्वांच्या अपेक्षा कसोशीने पूर्ण करण्याचे आव्हान माझ्यासमोर आहे. जिवापाड मेहनत घेऊन मी त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.

निवड झाल्यापासून मी राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुका निरीक्षकांना भेटलो व महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा व तालुक्यातील आणि विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सद्यस्थिती काय आहे याचाही आढावा घेतला. तसेच राज्यातील काही विविध भागांच्या दौऱ्यांनाही मी सुरुवात केली असून, जमिनीवरील पक्षाच्या कामाचा आढावा मी घेत आहे.

बंधू-भगिनींनो, मी गेली अठ्ठावीस वर्षे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा सदस्य आहे. या अठ्ठावीस वर्षांत अनेक राज्यकर्त्यांना आणि त्यांच्या धोरणात्मक निर्णयांना जवळून अनुभवण्याची संधी मला लाभली. मी आपल्याला खात्रीशीररित्या सांगू इच्छितो की, सध्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्राचे कृषी, आर्थिक, औद्योगिक व सामाजिक क्षेत्रातील अत्यंत दूरगामी नुकसान झालेले असून, ते योग्यवेळी दुरुस्त न झाल्यास त्याची फळे येणाऱ्या पिढ्यांना भोगावी लागतील. आज राज्यातील शेतकरी,मध्यमवर्ग आणि उद्योजक प्रचंड अस्वस्थ असून या तीनही वर्गांचे या सरकारने फार मोठे नुकसान केले आहे. येणाऱ्या निवडणुकांत सरकारला याची किंमत चुकवावी लागेल.

बंधू-भगिनींनो, २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभेच्या आणि त्यानंतर आलेल्या काही स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांत आपल्या पक्षाला काहीसे कमीअधिक प्रमाणात यश मिळाले, अर्थात त्याला विविध कारणे होती. तत्कालीन विरोधी पक्षाकडून आपल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर खोटेनाटे व तथ्यहीन आरोप करण्यात आले तसेच ‘बैलगाडीभर पुरावे देऊ’ अशी भाषाही करण्यात आली. मात्र सत्तेत येऊन चार वर्षे झाल्यानंतरही या सत्ताधाऱ्यांना आपल्या पक्षाच्या नेत्यांवरील कोणतेही आरोप सिध्द करता आलेले नाहीत. यातूनच आपले नेते संपूर्णपणे निष्पाप आहेत आणि आपल्या पक्षाची केवळ आणि केवळ बदनामी करण्यासाठीच हे आरोप करण्यात आले होते हे सिध्द होतं आहे.

बंधू-भगिनींनो, आपला पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या जीवनात घालून दिलेल्या मूल्यांनुसार वाटचाल करणारा पक्ष आहे. पवारसाहेबांनी आपली संपूर्ण हयात आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या स्वप्नातील महाराष्ट्र निर्माण करण्यात घालवली आहे. राज्यकर्ता म्हणून त्यांनी शाहूंचा आदर्श समोर बाळगला. यशवंतराव चव्हाण साहेब आणि शरद पवार साहेब यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत असलेले योगदान अतुलनीय आहे. सुसंस्कृत राजकारण, विकासाचे राजकारण आणि समतावादी राजकारण हि राजकारणाची त्रिसूत्री या दोन्ही नेत्यांकडून आपल्याला मिळाली. चव्हाण साहेब आणि पवार साहेब यांचा वैचारिक वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे.

बंधू-भगिनींनो, राज्यात सत्ताधारी पक्ष होऊन राज्यासाठी उत्तम काम करणे, हे तर आपल्या सर्वांचे ध्येय आहेच पण त्यासोबतच २१ व्या शतकाचा विचार करून नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज असलेला महाराष्ट्र घडविणे हे आपल्या पक्षाचे मुख्य ध्येय असावे.
या पुढील काळात आम्हा सर्वांना आधीपेक्षा कितीतरी पट अधिक वेळ हा पक्ष संघटनेसाठी द्यावा लागणार आहे आणि पक्षासाठी सर्वस्व झोकून देऊन काम करण्याची माझी आणि आम्हा सर्व सहकाऱ्यांची मनापासून इच्छा आणि तयारी आहे. या कामात मला आपल्या सर्वांची साथ हवी आहे. अर्थात,ती साथ आपण मला द्याल याची मला पूर्ण खात्री आहे.
या पुढील काळात आपल्याला पक्षात अनेक सुधारणा कराव्या लागतीन. गुणी, कर्तृत्ववान आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या पुढील काळात प्राधान्याने पक्षात संधी आणि जबाबदारी दिली जाईल. पक्षाचे विविध पातळ्यांवरील पदाधिकारी काय काम करतात याचे मूल्यमापन वेळोवेळी केले जाईन आणि गरज पडल्यास काम न करणाऱ्या आणि केवळ पदे मिरवणाऱ्या व्यक्तींना जबाबदारीतून मुक्त करण्याचाही पक्षाचा विचार आहे. पक्षाच्या विविध सेल्सनी या पुढील काळात आधीपेक्षा अधिक सक्रीय राहून काम करायला हवे. राज्याच्या विविध भागात अनेकजण चांगले काम करू पाहत आहेत, त्यांना संधी देण्याची पक्षाची इच्छा आहे.

जपान या देशात ‘कायझेन’ नावाचा सिद्धांत आहे. असं म्हणतात कि जपानची आज जी काही भरभराट झाली, त्यामागे हा सिद्धांत आहे, थोडक्यात त्याबद्दल सांगायचे झाल्यास कायझेन म्हणजे ‘सातत्यपूर्ण सुधारणा’ होय. तेच तत्व आपल्याला आपल्या पक्षात लावुन घेऊन सातत्यपूर्ण सुधारणा करून घ्याव्या लागतील.

बंधू-भगिनींनो, पवार साहेबांच्या राजकारणाचा भर महिला सक्षमीकरणावर राहिला आहे. आज स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना ५० टक्के प्रतिनिधित्व हे पवार साहेबांमुळे मिळालं. या पुढील काळातही अधिकाधिक महिलांना सार्वजनिक जीवनात काम करण्याची संधी कशी देता येईल याचा विचार आपण सर्वांनी मिळून करायला हवा. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या समाजाच्या सर्व स्तरांतील युवक युवतींना आपण पक्षात प्राधान्याने काम करण्याची संधी द्यायला हवी. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना या आधीही पक्षात कोणतेही स्थान नव्हते आणि या पुढेही पक्षात कोणतेच स्थान नसेल.

यापुढील काळात राष्ट्रवादीची बूथ स्तरावरील रचना मजबूत करण्याला पक्षात संपूर्ण प्राधान्य दिले जाईल. आम्ही नेते मंडळी नव्हे, तर बूथ स्तरावर काम करणारा पक्षाचा कार्यकर्ता हाच या पक्षाचा केंद्रबिंदू आहे. बूथ रचनेसाठी तयार करण्यात आलेल्या अँपचा संपूर्ण वापर आपण सर्वांनी करायचा आहे, या अँपद्वारे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला नेतृत्वापर्यंत संदेश पाठवता येईल आणि पक्ष नेतृत्वालाही पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत कोणताही निरोप पोहोचवता येईल. बूथ रचनेला प्राधान्य देताना या व्यवस्थेतून पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्याला पक्षातील महत्वाच्या उच्च पदांवर काम करण्याची संधी देण्याचा पक्षाचा मानस आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर उभा असेलेला पक्ष आहे.

सध्याचे सरकार हे दलित,आदिवासी आणि अल्पसंख्यांक समाजाच्या विकासाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करत असून दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांच्या कल्याणाचा खेळखंडोबा करणाऱ्या या सरकार विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे. दलित,आदिवासी आणि अल्पसंख्यांक समाजातील कोणत्याही घटकाचे कुठल्याही प्रकारे कणभरही नुकसान होत असल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष गप्प बसणार नाही. या समाजांचे हित आणि विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. भीमा कोरेगाव सारखी प्रकरणे घडवून दोन समाजांना एकमेकांच्या विरोधात उभं करण्याचा प्रयत्न काही मुलतत्ववादी विचारांचे लोक आज करत आहेत, हे प्रयत्न आपण हाणून पाडले पाहिजेत. आपल्या लेकीसारख्या असलेल्या असिफाची हत्या असेल वा रोहित वेमुलाची आत्महत्या असेल या घटना देशातील सामाजिक अस्वस्थतेच्या निदर्शक आहेत. राज्यकर्त्यांच्या निर्ढावलेल्या मनोवृत्तीचे दर्शनच यातून घडते.
येणाऱ्या काळात पक्षाच्या सर्व कार्यकारीण्यांमध्ये दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक आणि ओबीसी समाजांस प्रतिनिधित्व देण्यास आपला पक्ष कटीबद्ध आहे.

बंधू-भगिनींनो, प्रदेशाध्यक्ष पदी पक्षाने माझी केलेली निवड हा मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातील सर्वोच्च बहुमान समजतो. पक्ष मजबुतीसाठी मी सतत सक्रीय राहील आणि आपल्याला कधीही उपलब्ध असेल. आपल्या पक्षाला राज्यातील सर्वात ताकदीचा पक्ष बनवण्याचे काम आपल्या सर्वांसमोर आहे. मला गरज आहे ती आपल्या सर्वांच्या सक्रीय पाठिंब्याची.

आपला नम्र,

जयंत राजाराम पाटील