जयंत पाटील हे पात्रता नसताना राजकारणात आले आहेत; पडळकरांची खोचक टीका

सांगली:- गेली 20 वर्ष राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही, तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न हस्तगत करणं हेच आपलं उद्दिष्ट आहे, असं जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी इस्लामपूर येथे एका कार्यक्रमासाठी जयंत पाटील आले होते. यावेळी त्यांनी एका स्थानिक चॅनेलशी बोलताना मुख्यमंत्रीपदाबाबतचं आपलं स्वप्न उघड केलं. मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्ष बांधणी आणि आमदारांचं संख्याबळ वाढवणे यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, असं पाटील म्हणाले.

दरम्यान, जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या विधानावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील हे पात्रता नसताना राजकारणात आले आहेत. लोकनेते राजाराम बापू यांच्या निधनानंतर जयंत पाटील अनुकंपा निकषावर राजकारणात आले आहेत, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

तसेच जयंत पाटील राष्ट्रवादीतुन मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती निर्माण होईल असे वाटत नाही. जयंत पाटलांना यूनोमध्ये वगैरे पाठवता येत का हे पवार साहेबांनी पाहायला पाहिजे. कारण ते फार बुद्धिमान आहेत, असा त्यांच्या पक्षाचा समज आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. यासंदर्भात ‘टीव्ही 9 मराठी’ने वृत्त प्रकाशित केले आहे.

महत्वाच्या बातम्या