पंतप्रधान मोदींचे ऐतिहासिक व धाडसी पत्रकार परिषदेबद्दल अभिनंदन ; जयंत पाटलांचा टोला

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्रकार परिषदेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी चिमटा काढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ऐतिहासिक व धाडसी पत्रकार परिषदेबद्दल अभिनंदन. असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान येत्या १९ तारखेला होणार आहे. त्यामुळे आज सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. याचदरम्यान दिल्लीत भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची पत्रकार परिषद झाली. मोदींच्या या पत्रकार परिषदेवरून जयंत पाटील यांनी चिमटा काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ऐतिहासिक व धाडसी पत्रकार परिषदेबद्दल अभिनंदन. त्यांनी गोहत्या, नोटबंदी, राफेल भ्रष्टाचार, बेरोजगारी या सर्व प्रश्नांना नरेंद्र मोदींनी मनातल्या मनात उत्तरे दिली. अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

इतकेच नव्हे तर, याच मुद्यावरून विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ५ वर्षे तोंडात मूग गिळून बसलेल्या पंतप्रधानांनी लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात पत्रकार परिषदेला संबोधित केले. विशेष म्हणजे पत्रकारांच्या एकही प्रश्नाला उत्तर दिले नाही. या शौर्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे हार्दिक अभिनंदन! गिनीज बुक रेकॉर्ड वाल्यांनी आवर्जून नोंद घ्यावी. असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला