fbpx

ते सुपारी घेतात आणि महानगरपालिका जिंकतात ; जयंत पाटलांचा महाजनांवर हल्लाबोल

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीच्या परिवर्तन सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मध्यंतरी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘मला पक्षाने जबाबदारी दिली तर पवारांची बारामती देखील जिंकून दाखवू’, असे विधान एका जाहीर कार्यक्रमात केले होते. त्याला जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे.

जळगाव येथील राष्ट्रवादीच्या परिवर्तन सभेत बोलताना जयंत पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. “या जिल्ह्यात एक मंत्री आहेत, जे आता सुपारी मंत्री म्हणून प्रसिद्ध आहेत. ते सुपारी घेतात आणि महानगरपालिका जिंकतात धुळे, जळगाव, अमदनगर, नाशिक या पालिका त्यांनी पैशांच्या जोरावर जिंकल्या”, असं जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काल जळगाव इथे परिवर्तन सभा घेण्यात आली. या सभेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, फौजिया खान, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ उपस्थित होते.