भाजपने फक्त भाषणं केली, कर्जमाफी नाही – जयंत पाटील

jayant patil

सातारा : भाजप सरकारने त्यांच्या सत्तेच्या कार्यकाळात भाषणे जास्त केली. मात्र, कर्जमाफी व्यवस्थित केली नाही. महापूर, अतिवृष्टीने उध्दवस्त झालेल्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडीने धीर दिला आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांप्रमाणेच नियमित शेतकऱ्यांचाही लवकरच सन्मान केला जाणार आहे. महाविकास आघाडीचे हे सरकार जनतेच्या मनातील आहे. भाजप सरकामुळे सामान्यांना फायदा झालेला नाही, अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. सातारा जिल्हा परिषद यांच्या वतीने 7 ते 11फेब्रुवारी आयोजित केलेल्या शरद कृषी महोत्सवाचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले, कमी पाण्यात शेती करण्याचे वेड राज्याला लागले आहे. यासाठी हे शरद कृषी प्रदर्शन मार्गदर्शक ठरणार आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदा जास्त शेतकरी या प्रदर्शनाचा लाभ घेतील. स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्याप्रमाणे आ. मकरंद पाटील यांचे पाय जमिनीवर आहे. तात्यांचेच बाळकडू त्यांनी घेतल्याने ते हवेत काम करत नाहीत. खंडाळ्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊ.लोणंदकरांनी खेमावती नदीचे खोलीकरणाचे जे काम केले आहे ते कौतुकास्पद आहे. यामुळे नागरिकांना नदी, ओढे व नाल्याचे महत्व कळू लागले आहे.

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. यानंतर नियमित कर्जदारांचाही विचार होणार आहे. भाजपा सरकारने त्यांच्या कार्यकाळात भाषणे जास्त केली कर्ज माफी केली नाही. महाविकास आघाडीचे सरकार आपले आहे. जनतेच्या मनातील सरकार आहे. भाजपा मुळे सामान्यांना फायदा झाला नाही. तसेच राज्याचा आगामी अर्थसंकल्प दिशा देणारा ठरणार असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.