आघाडीवरुन जयंत पाटलांचा प्रकाश आंबेडकरांना अप्रत्यक्ष टोला

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना – भाजप महायुतीला सत्तेतून हटवण्यासंदर्भात भाष्य करत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीवर निशाणा साधला आहे. कोणाची भाजपाला मदत करण्याची भूमिका असेल, तर त्यापुढे आम्ही काहीही करू शकणार नाही, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले आहे.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना – भाजप महायुतीला सत्तेतून हटवण्यासंदर्भात भाष्य करत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीवर निशाणा साधला. राज्यात शिवसेना-भाजपा युती सरकारला हटवण्यासाठी सर्व समविचारी पक्षाला एकत्र आणण्याचे काम आघाडीकडून होत आहे.मात्र यात कोणाची भाजपाला मदत करण्याची भूमिका असेल, तर त्यापुढे आम्ही काहीही करू शकणार नाही, असे जयंत पाटील यांनी म्हंटले.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला दारुण पराभव स्वीकारावा लागला. लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीने काँग्रेस आघाडी सोबत हातमिळवणी न करता स्वबळाचा नारा दिला होता. वंचित आघाडीच्या स्वबळाच्या नाऱ्याचा काँग्रेस आघाडीला चांगलाच फटका बसला. राज्यात काँग्रेस केवळ एक जागा, तर राष्ट्रवादीला पाच जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या समवेत आघाडीच्या अनेक नेत्यांना वंचित आघाडीमुळे पराभवाला सामोरे जावं लागले आहे.

याचदरम्यान विधानसभा निवडणूका तोंडावर आहेत. लोकसभा निवडणूक काँग्रेस आघाडी आणि वंचित आघाडी वेगळे लाढल्याने आघाडीला जो पराभव स्वीकारावा लागला त्याच प्रमाणे विधानसभा निवडणुकीतही पराभव स्वीकारावा लागू नये म्हणून काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला आघाडीत घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रकाश आंबेडकर याना आघाडीचा प्रस्ताव पाठवण्यात आला. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आघाडीकडे ४० जागांची मागणी केली. परंतु काँग्रेस आघाडीला आंबेडकर यांचा हा प्रस्ताव मान्य नसल्याचे समोर आले होते. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे बोलले जात आहे.

वंचित बहुजन आघाडीने विदर्भातील विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर केल्याचे समोर आले आहे. आज १३ जुलै – नागपूर, १४ जुलै – अमरावती, तर १५ जुलै – अकोला, वाशीम आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये वंचित आघाडी मुलाखती घेणार असल्याचे बोलले जात जोते. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याचे दिसून येते.