भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी बॅलेटवर निवडणूक लढवावी,जयंत पाटलांचे भाजपला आव्हान 

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा औरंगाबाद येथील गंगापूरमध्ये दाखल झाली तेव्हा नागरिकांनी या सभेला भरघोस प्रतिसाद दिला. राज्य सरकारवर ५ लाख कोटीचं कर्ज आहे. ईव्हीएम हॅक होत असल्याच्या बातम्या टीव्हीवर येत आहेत. जर भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी बॅलेटवर निवडणूक लढवावी, असे आव्हान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या सभेत बोलताना दिले.

मनुस्मृती जाळली तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक केली मात्र भारताची घटना जाळली तर भाजप सरकारने त्यांना अटक नाही केली. डोंबिवलीचे भाजप उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला मात्र ते भाजप पक्षाचे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही, असा आरोप जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना मोदींनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली. मोदी जनतेला १५ लाख देण्यावरून जनता संतप्त झाली असून उपस्थितांपैकी एकाने पन्नास पैसे देखील मिळाले नसल्याचा राग मुंडेंसमोर व्यक्त केला. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल गौरवगान गात आहे. मात्र आरक्षण मिळण्यासाठी स्व. काकासाहेब शिंदे आणि त्यांच्यासारख्या अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आरक्षण मिळण्याबाबत संपूर्ण श्रेय सकल मराठा समाजाचे आहे, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी केले.