जयंत पाटील आणि फडणवीस एकत्र गडकरींच्या भेटीला; राजकीय क्षेत्रातील चर्चेनंतर भेटीचं कारण स्पष्ट

NITIN GADKRI

नवी दिल्ली : राजकारणात एकमेकांवर कितीही चिखलफेक केली तरी जेव्हा राज्याच्या हिताचा आणि विकासाचा प्रश्न येतो तेव्हा महाराष्ट्रातील नेते एका छताखाली एकत्र येऊन तो प्रश्न तडीस नेतात हे सुद्धा आज अधोरेखित झालं आहे. देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती अत्यंत वेगळी असल्याचं आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज दिल्लीत आहेत. महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक होती. या बैठकीच्या निमित्ताने फडणवीस, गडकरी आणि पाटील बऱ्याच दिवसानंतर एकत्र आले. विकास प्रकल्पाच्या अनुषंगाने हे नेते एकत्र आले होते.महाराष्ट्रातील नेते दिल्लीत विकास प्रकल्पाच्या निमित्ताने एकत्रित भेटण्याचं हे चित्रं बोलकं आणि दिलासादायक होतं. निवडणूक काळात कितीही आरोप-प्रत्यारोप केले तरी निवडणुकीनंतर वैरही संपतं. महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती ही मित्रत्वाची आहे, हेच पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

  • गडकरी, फडणवीस आणि पाटील एकत्र आल्याने राजकीय चर्चा रंगली नसती तर नवलंच. हे तिन्ही नेते एकत्र आल्याने त्याचे राजकीय अर्थही काढले जाऊ लागले आहेत. मात्र, ही केवळ प्रकल्पांचा निपटारा करण्यासाठीची भेट असून त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितलं जात आहे. सदर बैठक हि महाराष्ट्रातील विविध विकासकामांसाठी घेण्यात आली होती याबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी महत्वाच्या प्रकल्पांबाबत माहिती दिली ती खालीलप्रमाणे –
  • गोसेखुर्द प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पासाठी एकूण 5 हजार कोटींचा खर्च येणार आहे. मात्र, दरवर्षी 1500 कोटी रुपये जरी मिळाले तरी हा प्रकल्प दोन वर्षात मार्गी लागेल.
  • नाग नदी वळण घेणार : नागपूरची पुरातन नाग नदीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. हा प्रकल्प एकूण 1700 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मंजुरीही मिळाली होती. मात्र, कोरोनामुळे हे काम थांबलं होतं. कोरोनामुळे आर्थिक संकट उभं राहिल्याने सरकारने कोणताही नवा प्रकल्प हाती न घेण्याचं ठरवलं होतं. मात्र, केंद्रीय अर्थमंत्र्यांशी बोलून हा प्रकल्प सुरू करण्याची परवानगी मिळवली आहे. त्यामुळे आता सल्लागार वगैरे नेमून टेंडर प्रक्रिया सुरू करू, त्यामुळे लवकरच हा प्रकल्प मार्गी लागेल, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.
  • मुळा-मुठा प्रकल्प पूर्ण होणार : पुण्यातील मुळा-मुठा नदीचं पुरुज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1200 कोटींचा हा प्रकल्प आहे, तो लवकरात लवकर पूर्ण करण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला.

महत्वाच्या बातम्या