जसप्रीत बुमराहचा विक्रम, हॅट्ट्रिकसह घेतले ६ बळी

टीम महाराष्ट्र देशा:- भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेट सामन्यात एक नवा विक्रम करत इतिहास रचला आहे. शनिवारी वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दिवशी भारतीय संघाने सर्व बाद ४१८ धावा केल्या . त्यानंतर बुमराहने विंडीजच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. बुमराहनं त्याच्या चौथ्या षटकांत सलग तीन गडी बाद करून कारकिर्दीतील पहिली हॅट्ट्रिक नोंदवली.

बुमराहनं चौथ्या षटकात ड्वेन ब्राव्हो, शमारा ब्रूक्स आणि रोस्टन चेज यांना बाद केले . तिसऱ्या चेंडूवर ब्राव्हो झेलबाद झाला. त्यानंतर ब्रुक्स आणि रोस्टन चेज यांना पायचित केले . बुमराहनं ९ .१ षटके गोलंदाजी करताना ३ षटके निर्धाव टाकली. त्यानं १६ धावा देत विंडीजचे ६ फलंदाज तंबूत धाडले.

अँटिग्वा कसोटीत विंडीज विरोधात केवळ ७ धावा देत ५ विकेट घेणाऱ्या बुमराहने किंगस्टनमध्येही आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. एकापाठोपाठ एक फलंदाजांना त्याने पॅव्हेलियनमध्ये धाडले. पहिल्या कसोटीत बुमराहने ५ विकेट घेतल्या. तर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात सध्या त्याने ६ विकेट घेतल्या आहेत.

दरम्यान बुमराहच्या आधी भारताकडून हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी अशी कामगिरी केली आहे. हरभजन सिंगने २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर इरफान पठाणने पाकिस्तानविरुद्ध २००६ मध्ये अशी कामगिरी केली होती.