जपानचे राजदूत मिशिओ हाराडा यांची वेरूळ-अजिंठा लेणीभेट

blank

औरंगाबाद : जपान सरकारने जगप्रसिद्ध वेरूळ-अजिंठा लेणीच्या संवर्धनासाठी सहकार्य केले आहे. लेण्यांचे सौंदर्य ऐकून मी भारावून गेलो असून, त्या पाहण्यासाठी औरंगाबादला आलो. जपान-भारत पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही जपानचे भारतातील राजदूत मिशिओ हाराडा यांनी दिली.

जगप्रसिद्ध वेरूळ-अजिंठा लेणी पाहण्यासाठी शहरात आलेले जपानचे राजदूत मिशिओ हाराडा यांच्यासह शिष्टमंडळाने शुक्रवारी सायंकाळी महापालिका मुख्यालयात महापौर नंदकुमार घोडेले यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, तीन महिन्यांपूर्वी पदभार घेतला असून, महाराष्ट्रातील पहिलाच दौरा औरंगाबादचा आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी शनिवारी पाहायला जाणार आहे.

त्यानंतर वेरूळ येथील लेणींची पाहणी करणार आहे. जपानच्या मदतीने सुरू झालेल्या भालगाव आणि वाळूज एमआयडीसीमधील दोन कंपन्यांना भेट देणार असल्याचे हाराडा यांनी सांगितले. महापौरांनी सांगितले की, औरंगाबाद 52 दरवाजांचे ऐतिहासिक शहर आहे. ताजमहालची प्रतिकृती बीबी-का-मकबरा, पाणचक्की अशी पर्यटनस्थळे शहरात आहेत. पर्यटकांसाठी महापालिकेचे नेहमीच सहकार्य असते.

ऑलिंपिकसाठी महापौरांना निमंत्रण

२०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धा बघण्यासाठी महापौरांसह पदाधिकाऱ्यांना त्यांनी निमंत्रित दिले. पुढील वर्षी ऑलिंपिक स्पर्धा बघण्यासाठी भारतातून जास्त संख्येने पर्यटक येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मिशिओ यांच्यासोबत हिंदुस्थान कंपोझिटस लिमिटेडचे संचालक विनय सरीन, कंपनीचे अधिकारी विनय शेट्टी आणि आनंद भराडिया उपस्थित होते.