‘जनाबाई जाधवांच्या कविता या वेदनेतून उगवलेल्या’

औरंगाबाद: मन हलकं करण्यासाठी माणुस एक मार्ग शोधत असतो. जनाबाई जाधव यांना तो मार्ग त्यांच्या कवितेत गवसला. साध्या भोळ्या मनाला, शेतातील काळ्या मातीला, मनातील व समाजाच्या दुखा:ला वाचा फोडण्याचे काम जनाबाई जाधव यांनी केले आहे, असे गौरवोद्गार प्रख्यात कवी व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांनी काढले. पंचफुला प्रकाशनातर्फे प्रकाशित व जनाबाई जाधव लिखित ‘चोळी’ आणि ‘ओंजळी’ या दोन कवितासंग्राहांचे प्रा. दवणेंच्या हस्ते प्रकाशन पार पडले. एमजीएम महाविद्यालयाच्या रुक्मिणी सभागृहात शनिवारी संध्याकाळी हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी बोलतांना प्रा. दवणे म्हणाले की, एमए झालेला माणुसच उत्तम दर्जाच्या कविता लिहू शकतो असा समज आपल्याकडे झालेला आहे. त्याला छेद देण्याचे काम जनाबाई यांनी केले. त्यांच्या कविता वाचल्यानंतर मला बहिणाबाई चौधरींच्या कविता आठवल्या. लग्न होऊन ठाण्यात गेलेली एक मुलगी ठाण्याचे निवासी असलेल्या आणि महाराष्ट्रच्या साहित्य क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती असलेल्यांना आपल्या माहेरी औरंगाबादेत काय घेऊन येते आणि त्यांच्या हस्ते कार्यक्रम काय पार पाडते. असे म्हणत प्रशांत डिंगणकर यांनी जनाबाई यांच्या कन्या अँडव्होकेट सुदर्शना विनोद जगदाळे यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना पंचफुला प्रकाशनचे डॉ. बालाजी जाधव यांनी मागील अडीच ते तीन वर्षांदरम्यान आलेले अनुभव, अडचणी आणि जनाबाई जाधव यांच्या कुटुंबियांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी मंचावर पंचफुला प्रकाशनचे डॉ. बालाजी जाधव, ज्येष्ठ पत्रकार नितीन सांवत, बाळ कांदळकर, प्रशांत डिंगणकर, जनाबाई जाधव यांचे वडील देवराव कमानदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रविणा कन्नडकर यांनी तर आभार प्रदर्शन विनोद जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विनोद जगदाळे, दीपक जाधव, प्रकाश जाधव यांनी परिश्रम घेतले.

महत्त्वाच्या बातम्या