जान मोहम्मदचे दाऊद गॅंग कनेक्शन उघड; महाराष्ट्र ATSने केला शिक्कामोर्तब

daud gang

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 2 पाकिस्तानी नागरिकांसह एकंदर सहा दहशतवाद्यांना यांसदर्भात अटक केली आहे. दरम्यान या कटात पकडला गेलेला एक अतिरेकी हा मुंबईच्या धारावी येथे राहणारा होता.

याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र एटीएसने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी आपली भूमिका मांडली. महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अगरवाल यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. दहशतवाद्यांचे मुंबई कनेक्शन समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने पत्रकार परिषद घेत अटक करण्यात आलेला दहशतवादी जान मोहम्मद याच्याबाबत मोठी माहिती दिली आहे.

मुंबईतील धारावीत राहणारा जान मोहम्मद याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून तो गेल्या 20 वर्षांपासून डी कंपनीच्या संपर्कात होता अशी माहिती एटीएस प्रमुखांनी दिली आहे. यावेळी बोलताना विनीत अगरवाल यांनी सांगितले कि, जान मोहम्मदच्या हालचालींवर अनेक दिवसांपासून एटीएसचं लक्ष होतं. जान मोहम्मद गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या रडारवर होता.

पायधुनी पोलीस स्टेशनमध्ये जान विरोधात 20 वर्षांपूर्वीची केस आहे. या प्रकरणात एटीएसचं अपयश नाहीये. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी कारवाईसाठी एटीएसला पूर्ण मोकळीक दिली आहे. जान मोहम्मद शेख याच्यावर कर्ज होते आणि त्याला पैशांची गरज होती. त्याने कर्ज काढून एक टॅक्सी घेतली होती पण त्या कर्जाची परतफेड करु न शकल्याने त्याने पुन्हा डी गॅंगला संपर्क केला अशी माहितीही एटीएसने पत्रकार परिषदेत दिली.

तसेच जान मोहम्मद शेख याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र एटीएसची टीम आज संध्याकाळी मुंबईतून दिल्लीसाठी रवाना होणार आहे. जान मोहम्मद याच्या संदर्भातील आमच्याकडे असलेली माहिती दिल्ली पोलिसांना देण्यात येईल आणि दिल्ली पोलिसांकडे असलेली माहिती आम्ही घेऊ असेही यावेळी एटीएसने स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या