काश्मीर खोऱ्यात माथेफिरू, फुटीरतावाद्यांचा हिंसाचार, तीन पोलीस शहीद

टीम महाराष्ट्र देशा : रमजान ईदप्रमाणे बकरी ईदच्या दिवशी मोठा हिंसाचार भडकण्याची शक्यता असल्याने कश्मीर खोऱ्यात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीदेखील      सोपोर, बारामुल्ला, कुपवाडा येथे बकरी ईदच्या नमाजानंतर कश्मीर खोऱ्यात माथेफिरू, फुटीरतावाद्यांनी हिंसाचार भडकविला. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात प्रचंड तणाव वाढला आहे. देशविरोधी घोषणा देत पाकिस्तान आणि ‘इसिस’चे झेंडे फडकविले. श्रीनगरसह अनेक शहरांत लष्करी जवान आणि पोलिसांवर दगडफेक ही यावेळी केली. दरम्यान, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन पोलीस शहीद झाले.

नमाज अदा करून घरी परतणारे पोलीस कॉन्स्टेबल फय्याज अहमद शाह यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. फय्याज शाह हे पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रात होते. ईदसाठी ते घरी आले होते. तर दुसरी घटना पुलवामा येथे घडली. पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद याकूब शाह यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. त्यात याकूब शाह शहीद झाले. तर कुपवाडा येथे भाजपचे कार्यकर्ते शब्बीर अहमद भट यांची दहशतवाद्यांनी हत्या केली.

दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीत दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेत डॉ. अब्दुल्ला यांनी जोशपूर्ण भाषण केले. अब्दुल्ला यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘जय हिंद’ च्या घोषणा दिल्या होत्या. याचाच राग मनात धरून डॉ. अब्दुल्ला यांना आज श्रीनगरात धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेनंतर बोलताना अब्दुल्ला म्हणाले, काही माथेफिरू लोकांना वाटते मी घाबरून जाईन, पण असे होणार नाही. ‘भारत माता की जय’चा नारा देण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही. मी नारा देणारच. हा देश सर्वांचा आहे.

दरम्यान, श्रीनगर येथील इदगाह मैदानावर हुरियतचा फुटीरतावादी नेता मीरवाईज उमर फारुखचे भडकावू भाषण झाले. नमाजानंतर मोठा जमाव दगडफेक करीत रस्त्यावर उतरला. पोलीस आणि लष्करी जवानांवर दगडफेक सुरू केली.

सुवर्णपदक विजेत्याला महाराष्ट्र शासनाकडून 50 लाख रुपये – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस