fbpx

Breaking News : जम्मू काश्मीर खोऱ्यात हाय अलर्ट, पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीर खोऱ्यातून मोठे वृत्त समोर आले आहे. जम्मू काश्मीर मधील सैन्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानकडून मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भूदल , वायुदल आणि सर्व सुरक्षा सैनिकांना तैनात राहण्याचे आदेश दिले आहेत. भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी याबाबतची माहिती दिली आहे. गुप्तचर यांत्रेनेकडून आलेल्या माहिती नुसार जम्मू काश्मीर खोऱ्यात सैनिकांनी जबरदस्त बंदोबस्त वाढवला आहे.

जम्मू काश्मीरचे कलम 370 हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानकडून वारंवार युद्धाची धमकी दिली जात आहे. मात्र भारत पाकिस्तानच्या पोकळ डरकाळीला भिक घालत नसल्याने पाकिस्तान पाठी मागून हल्ला करणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. १५ ऑगस्टच्या रात्री म्हणजे काल देखील सीमा भागात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. मात्र भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे 3 जवान जागीच मारले.

दरम्यान गेल्या 2-3 दिवसांपासून काश्मीरातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाकडून राज्यातील सर्व शाळा-कॉलेज आणि सरकारी कार्यालये येत्या सोमवारपासून खुले करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर शुक्रवार पासूनचं प्रशासकीय कामाला सुरवात झाली आहे. जम्मू काश्मीर खोऱ्यात शांतता कायम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाकडून शाळा महाविद्यालये सुरु करण्याचे निर्देश दिले गेले आहेत, असे सगळे ठीकठाक सुरु असतानाचं गुप्तचर यंत्रणेने जम्मू काश्मीरला सतर्कतेचा इशारा दिला आहे.