fbpx

जालन्याच्या रणसंग्रामातून बच्चू कडूंची माघार; रावसाहेब दानवे यांना मोठा दिलासा

जालना – प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. पत्रकार परिषदेला औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष सुधाकर विश्वनाथ शिंदे, जालन्याचे जिल्हाध्यक्ष नारायण गजर यांनी ही पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कडू यांनी दानवे यांच्याविरोधात रान पेटवले होते. आमदार बच्चू कडू यांनी ४ दिवसांपूर्वीच घेतलेल्या मेळाव्यात आपण २८ तारखेला भूमिका स्पष्ट करू असे सांगितले होते. मात्र आता अचानक कडू यांनी माघार घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी घेतलेली माघार हे देखील एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी देखील आता आपले बंडखोरीचे अस्त्र म्यान केल्याने दानवे यांच्यासमोरील अडचणी कमी झाल्या होत्या. आता कडू यांनी देखील या निवडणुकीतून माघार घेतल्याने दानवे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या दोघांनी माघार घेतल्याने आता कॉंग्रेसचे विलास औताडे आणि रावसाहेब दानवे हे दोघे आमने-सामने असतील.