भुजबळांच्या सुटकेनंतर नाशिकामध्ये जल्लोष; समर्थकांकडून फटाके, ढोल-ताशा वाजवत आनंद साजरा

नाशिक : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. या प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळ मुक्त करत त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. मुंबईतील सत्र न्यायालायाने आज हा निर्णय दिला. मंत्री छगन भुजबळांसह माजी खासदार समीर भुजबळ व इतरांची आज सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर नाशिक येथील भुजबळ फार्म येथील कार्यालयात समर्थकांकडून न्यायालयाच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी फटाके, ढोल ताशा वाजवत पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांना बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणी गेल्या 5 वर्षांपासून भुजबळांचा लढा सुरु होता. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. भुजबळ साहेब आणि इतर सर्वजण या प्रकरणातून निर्दोष सुटतील असा आमचा ठाम विश्वास होता. तो विश्वास आज न्यायालयाच्या निर्णयानंतर अधिक पक्का झाला आहे. महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही नम्रपणे स्वागत करतो, अशा भावना यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांचा मुलगा पंकज भुजबळ, पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ, तनवीर शेख , इरम शेख , संजय जोशी , गीता जोशी , पीडब्ल्यूडी सचिव गंगाधर मराठे यांचं नावही महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून वगळण्यात आलं आहे. न्यायलयाच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या