जालियनवाला बाग हत्याकांडाला आज १०० वर्षे पूर्ण !

blank

टीम महाराष्ट्र देशा : इतिहासातील काही घटना अशा आहेत की त्या आजही तितक्याच ताज्या आहेत. जालियनवाला बाग म्हटले की जे हत्याकांड आठवते, या हत्याकांडाला आज शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.

काय आहे जालियनवाला बाग हत्याकांड ?

जालियनवाला बाग भारताच्या पंजाब राज्यातील अमृतसर शहराचा एक भाग आहे. १३ एप्रिल १९१९ रोजी ब्रिटिश पोलिसांनी तेथे भरलेल्या सभेतील निःशस्त्र नागरिकांवर अंदाधुंद गोळ्या झाडून शेकडोंना ठार मारले. एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामधे ३७९ लोकांचा मृत्यू झाला तर अनाधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा १,००० हून अधिक आहे.

जालियनवाला बाग सभा –

अमृतसर अखंड भारतातील पंजाब राज्यातील एक महत्त्वाचे शहर होते. १० एप्रिल १९१९, रोजी सकाळी एक घोळका अमृतसरच्या डेप्युटी कमिशनरच्या घराकडे जात होता. कारण होते दोन प्रसिद्ध स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेच्या मागणी, सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलु, असे २ वीर ज्यांच्या विरुद्ध तडीपार करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. ह्या घोळ्क्यावर सैन्याच्या एका तुकडीने बेछूट गोळीबार केला. त्याचे पडसाद त्याच दिवशी उमटले. ब्रिटिश सरकारच्या अस्तित्त्वाची जाणीव करून देण्याऱ्या ईमारतींना आग लावण्यात आली. टाउन हॉल, दोन बँकाच्या इमारती, तारघर, रेल्वेचे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. गुरखा रेजीमेंटने रेल्वे स्थानकाचा बचाव केला. रेल्वे गोदामाचा एक युरोपीयन रक्षकाला जोरदार मारहाण करण्यात आली, तीन बँक कर्मचारी आगीत ठार झाले, तर एका युरोपीयन नागरीकाचा रस्त्यात खून करण्यात आला. एका ब्रिटिश महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला, पण काही भारतीयांनी तिचे प्राण वाचविले. दिवसभर हे थैमान चालू होतेच.

हत्याकांडाच्या प्रतिक्रिया

भारतभर या हत्याकांडाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नोबेल पारितोषिक विजेते गुरू रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांना इंग्रजांनी दिलेली ‘सर’ ही पदवी परत केली. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतीकारक जन्माला आले. शहिद उधम सिंग (जे स्वतः या हत्याकांडामधे जखमी झाले होते) यांनी १३ मार्च १९४० या दिवशी या हत्याकांडाचे उत्तर म्हणून मिशाएल ओ’डायर (जो या हत्याकांडाचा सुत्रधार होता) यांवर बंदुकितून गोळ्या झाडुन वध केला.

भारतात ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीची साक्ष असणाऱ्या आणि भारताच्या इतिहासातील एक दुःखद घटना जालियनवाला बाग हत्याकांडाला आज १०० वर्षे पूर्ण झाली. या घटनेची ब्रिटन सरकारने औपचारिकरित्या दोन दिवसांपूर्वीच माफी मागितली आहे. दरम्यान, आज या घटनेला १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त डोमिनिक एसक्विथ यांनी अमृतसर येथील जालियनवाला बागमधील स्मारकाला भेट दिली आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील येथे उपस्थिती लावून श्रद्धांजली वाहिली.