आनंदाची बातमी : कोरोना हारतोय, ‘या’ जिल्ह्यात रिकव्हरी रेट ९० टक्क्यांवर !

corona

जळगाव : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने थैमान घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील स्थिती गंभीर झाली आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून आरोग्य व्यवस्थेवर देखील मोठा ताण निर्माण झाला आहे. या लाटेतील कोरोना स्ट्रेन हा अधिक धोकादायक असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे.

देशातील इतर राज्यांमध्ये कोरोनाचे संकट वाढत असले तरी महाराष्ट्राबाबत काहीशी दिलासादायक माहिती समोर येत आहे. गेले काही दिवस साठ हजरांपार असलेला नव्या रुग्णांचा आकडा कमी होत आहे. काल दिवसभरात ४८ हजार ६२१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील महाराष्ट्रातील स्थिती सुधारत असल्याची टिपण्णी केली आहे.

अशात जळगाव जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत करोना बाधित झालेल्या १ लाख २४ हजार ६४६ रुग्णांपैकी १ लाख १२ हजार ३५६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९०.१४ टक्क्यांवर पोहचले असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे

करोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान व इतर उपाययोजनांमुळे जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांच्यावर पोहचले होते. मात्र जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट आल्यानंतर १० फेब्रुवारीपासून हे प्रमाण कमी झाले होते. तर ३१ मार्च रोजी हे प्रमाण ८४.९२ टक्क्यांपर्यत खाली आले होते. परंतु, त्यानंतरच्या काळातही जिल्हा प्रशासनाने करोनाची साखळी खंडित करण्यासाठी बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्ण शोध मोहिमेंतर्गत करोनाची लक्षणे दिसून येणाऱ्यांचे स्वॅब घेऊन करोना चाचण्या वाढविल्या होत्या. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून त्यांचेवर वेळेत उपचार होत असल्याने आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. शिवाय मृत्युदर कमी करण्यातही आरोग्य यंत्रणेला यश येत आहे.

महत्वाच्या बातम्या