fbpx

नामांकित राजकीय नेत्याच्या फार्म हाऊसवरील ‘रंगिल्या’ पार्टीवर पोलिसांची धाड

जळगाव : तालुक्यातील ममुराबाद येथे एका नामांकित राजकीय नेत्याच्या फार्म हाऊसवर मद्यप्राशन आणि तरुणींच्या नाचगाण्यासह सुरु असलेल्या ‘रंगिल्या’ पार्टीवर डीवायएसपींसह पोलिसांच्या पथकाने धाड टाकून 6 तरुणींसह 18 जणांना 31 डिसेंबरला मध्यरात्री ताब्यात घेतले. या कारवाईनंतर संशयितांना हजर करण्यासाठी तब्बल 18 तासांचा विलंब झाल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले होते. रात्री उशिरापर्यंत न्यायालयीन कामकाज सुरु होते.

या कारवाईमुळे जळगाव शहरात विविध चर्चांना उधाण आले होते. या पार्टीत शहरातील नामांकित व्यापारी, राजकीय नेते, पोलीस विभागातील एक कर्मचारीही सहभागी असून त्यांना वाचविण्यासाठी पोलीस प्रशासनावर दबाव आल्याचे बोलले जात आहे.संशयितांपैकी काहींनी पार्टीत नाचणार्या तरुणींसोबत बिभत्स कृत्य केल्याच्या संशयातून पोलिसांनी त्यांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी देखील केली.

ममुराबाद रस्त्यावरील एका शेतात असलेल्या फार्म हाऊसवर ‘रंगिला’ पार्टी सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी पथकासह 2 वाजता फार्म हाऊसवर धाड टाकली. तेथे सहा तरुणी व अनेक पुरुष नशेत नृत्य करीत होते. अचानक आलेला पोलिसांचा ताफा पाहून अनेकांनी पळ काढला तर सहा तरुणी व 18 जण पोलिसांच्या हाती लागले. या सर्वांना तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या फार्म हाऊसवर जुगार अड्डाही चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.