‘जलयुक्त शिवार’ पत्रकार पुरस्कार : राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्याला १ लाखांचे बक्षीस

increase-amount-water-scarcity-journalist-award/

मुंबर्इ : जलयुक्त शिवार पत्रकार पुरस्कारांच्या रकमेत यंदाच्या वर्षापासून शासनाने भरघोस वाढ केली असून राज्यस्तरीय विजेत्याला पहिल्या क्रमांकासाठी तब्बल १ लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे. या बाबतचा शासन निर्णय ९ ऑगस्टला निर्गमीत करण्यात आला आहे. या नवीन निर्णयानुसार विभागीय स्तरावरील प्रथम बक्षीसही ५० हजार रुपये तर जिल्हास्तरीय प्रथम बक्षीसही ३१ हजार रुपये इतके करण्यात आले आहे. या साठी प्रवेशिका विहीत नमुन्यात सादर करण्याची मुदत २० ऑक्टोबरपर्यंत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानात वृत्तपत्रातून तसेच डिजीटल माध्यमाद्वारे जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या पत्रकारांना राज्य शासनाच्या वतीने गेल्या वर्षीपासून राज्य, विभाग तसेच जिल्हा या तीन स्तरांवर हे पुरस्कार देण्यात येतात. यंदाच्या वर्षी मुद्रित माध्यम गटासाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर प्रत्येकी तीन पुरस्कार देण्यात येतील.

यात जिल्हा स्तरावरील प्रथम क्रमांकाला ३१ हजार, द्वितीय क्रमांकास २१ हजार, तृतीय क्रमांकास १५ हजार, विभागीय स्तरावरील प्रथम क्रमांकाला ५० हजार, द्वितीय क्रमांकाला ३५ हजार, तृतीय क्रमांकाला २५ हजार तर राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाला १ लाख, द्वितीय क्रमांकाला ७१ हजार, तृतीय क्रमांकाला ५१ हजार असे बक्षीस देण्यात येर्इल. या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना स्मृतीचिन्हही देण्यात येणार आहे.

तसेच इलेक्ट्रानिक माध्यमातील मराठी वृत्तकथा प्रसारित करणाऱ्यांना राज्यस्तरावर तीन पुरस्कार देण्यात येणार असून त्याचे स्वरुप प्रथम क्रमांकास १ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास ७१ हजार तर तृतीय क्रमांकास ५१ हजारांचे बक्षीस देण्यात येते. राज्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागीय स्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार तर जिल्हा स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार या नावाने पुरस्कार देण्यात येतात.

या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यात प्रकाशित होणाऱ्या मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेतील साप्ताहिके व पाक्षिकांतील लिखाणाचा विचार केला जाणार असून या पुरस्कारासाठी मुद्रित माध्यम आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम असे गट करण्यात आले आहेत. १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत प्रसिध्द झालेल्या बातम्यांचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात येणार आहे.