मुलीला वाचवण्यासाठीच जेटली शांत – राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा : आपल्या मुलीला वाचविण्यासाठीच केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी पंजाब नॅशनल बँकेतील १५ हजार कोटींच्या घोटाळाप्रकारणात मौन साधल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ट्विट करत राहुल गांधी यांनी ही टीका केली आहे.

नीरव मोदी व मेहुल चोकसी यांचा हा ‘पीएनबी’ घोटाळा उघड होण्यापूर्वीच त्यातील आरोपींनी जेटली यांच्या वकील असलेल्या मुलीच्या लॉ फर्मला मोठी फी देऊन ‘रिटेनरशिप’ म्हणून नेमले होते. आरोपींना कायदेविषयक सल्ला दिलेल्या इतर लॉ फर्मच्या कार्यालयावर ‘सीबीआय’ने धाड टाकली. मग जेटलींच्या मुलीच्या फर्मला का वगळण्यात आले, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधींनी ज्याचा उल्लेख केला ती मे. जेटली अ‍ॅण्ड बक्षी नावाची दिल्लीतील लॉ फर्म असून त्यात जेटलींची मुलगी व जावई हे भागिदार आहेत. सीबीआयने ज्यांच्या मुंबईतील कार्यालयावर धाड टाकून नीरव मोदीशी संबंधित कागदपत्रे हस्तगत केली ती लॉ फर्म मे. सिरिल अमरचंद मंगलदास या नावाची आहे. या फर्मला नीरव मोदीने डिसेंबरमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून नेमले होते, असे सीबीआयचे म्हणणे आहे.