fbpx

जैन मुनींना अतिरेकी संबोधणे ही बौध्दिक दिवाळखोरी – खा.दिलीप गांधी

deelip kumar gandhi

अहमदनगर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा झालेला दारूण पराभव जिव्हारी लागल्यानेच शिवसेनेचे खा.संजय राऊत बेताल वक्तव्य करीत आहेत. जैन समाजाचे आदरणीय असणार्या जैन मुनींना अतिरेकी संबोधणे ही कोत्या बुध्दीची दिवाळखोरी आहे, अशी सणसणीत टीका भाजपाचे अहमदनगर येथील खा.दिलीप गांधी यांनी केली असून खा.राऊत यांनी जैन मुनी व संपूर्ण जैन समाजाची माफी मागावी,अशी मागणी देखील खा.गांधी यांनी केली आहे.

दरम्यान खा.राऊत यांनी जैन मुनींच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सकल जैन समाजाच्या वतीने गुरुवारी दुपारी नगर मध्ये मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले. मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा दारूण पराभव झाल्यानंतर बुधवारी शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत मीरा-भाईंदर मधील भाजपाचा विजय हा मनी-मुनींमुळे झाला असल्याचे सांगून जैन मुनींवर प्रखर टीका केली होती.

खा.राऊत यांनी जैन मुनींना अतिरेकी असे देखील संबोधले होते. या पाश्र्वभूमीवर प्रसिध्द केलेल्या निवेदनात भाजपा खा.दिलीप गांधी यांनी खा.राऊत यांच्यावर टीका केली आहे. खा.गांधी यांनी म्हटले आहे की,जैन समाजात जैन मुनींसाठी अतिशय कडक अशा स्वरूपाची आचारसंहिता असते.

भगवान महावीर व २४ तीर्थंकरांनी आचरणात आणलेली जीवनपध्दती व जैन धर्माचा लाखो वर्षांचा इतिहास जैन मुनींनी आपल्या आचरणाने जनतेपर्यंत पोहोचविण्याचे मोलाचे काम केलेले आहे. जैन धर्मात मुंगीची सुध्दा हत्या करणे पातक मानले जाते. अशा स्थितीत जैन मुनींना अतिरेकी म्हणणे म्हणजे बौध्दिक दिवाळखोरी चे लक्षण आहे. राऊत यांनी जैन मुनींच्या बद्दल केलेले आपले वक्तव्य त्वरित मागे घेऊन जैन मुनी व संपूर्ण जैन समाजाची माफी मागावी. तसेच समाजात व्देष निर्माण करण्याचे काम करू नये, अशी मागणी खा.दिलीप गांधी यांनी केली आहे.