जयकुमार गोरेंनी घेतली राधाकृष्ण विखेंची भेट

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते पक्षांतर करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये रोज वेगवेगळी नावे समोर येत आहेत. यात अजून एका नावाची भर पडली आहे. माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपच्या वाटेवर असलेल्या राधाकृष्ण वेखे पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे तेही आता भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे विधानसभेचे विरोधीपक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपप्रवेश करणार हे निश्चित झाले आहे. परंतु आता ते त्यांच्यासोबत किती आमदार घेवून जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. त्यामुळे कॉंग्रेसला चांगलाच फटका बसणार आहे.

दरम्यान, जयकुमार गोरे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत एका गाडीतून प्रवास केला त्यामुळे गोरे हे विखे पाटलांसह भाजपमध्ये जाणार या विधानाला बळकटी मिळत आहे. तसेच काँग्रेसमधून निलंबीत झालेले आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मी एकटाच नाही तर माझ्यासह काँग्रेसचे ७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.