जग्गा जासुस फेम अभिनेत्री बिदिशा बेजबरुआची आत्महत्या

वेबटीम : प्रसिद्ध आसामी अभिनेत्री आणि गायिका बिदिशा बेजबरुआ हिने गुडगाव येथील राहत्या घरी आत्महत्या केली. ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात तिने एक भूमिका साकारली होती. ३० वर्षीय बिदिशाने बऱ्याच स्टेज शोमध्येही तिनं परफॉर्म केलंय. बिदिशाच्या वडिलांनी तिला फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ती उत्तर देत नसल्यामुळे त्यांनी पोलिसांची मदत घेतली तेव्हा हा सर्व प्रकार उघड झाला.
एका गुणी अभिनेत्रींच्या मृत्युमुळे सध्या अनेकांनाच धक्का बसला आहे. दिल्ली (पूर्व)चे पोलीस उपायुक्त दीपक शरण यांनी दिलेल्या माहितीनुसार गुडगाव येथील राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत बिदिशाचा मृतदेह सापडला. गुडगाव येथे काही दिवसांपूर्वीच तिने हे घर भाड्याने घेतलं होतं. गुडगाव येथील सुशांत लोक बी- ब्लॉक येथे घडलेल्या या घटनेनंतर बिदिशाच्या वडिलांचा जबाब नोंदवत तिचा पती नितिश झा याच्याविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 या सर्व प्रकरणी पोलीस चौकशी सुरु असून बिदिशा आणि तिच्या पतीमध्ये असं काय झालं की तिला आत्महत्येचं पाऊल उचलावं लागलं यामागचं कारण शोधलं जात आहे.