‘दोन वर्षे झाली, अजून ते मुख्यमंत्रिपदाच्या मानसिकतेतून बाहेर आलेच नाहीत’, मलिकांचा टोला

मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर येथे आमदार मंदा म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक राजकीय चर्चांना उधाण आणणारे वक्तव्य केले. ‘मला एकही दिवस जाणवले नाही, की मी मुख्यमंत्री नाही. मला आजही असे वाटते की मी मुख्यमंत्रीच आहे’ असे वक्तव्य त्यांनी केले होते.

‘तुमच्यासारखे नेते पाठीशी, सोबत असल्यामुळे मला एकही दिवस वाटले नाही की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नाही. मला आजही असे जाणवते की मी मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्वाचे नाही. तो काय करतो हे महत्वाचे आहे. गेली दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेत आहे. त्यामुळे जनतेनेही मला जाणवू दिले नाही. मला आशीर्वाद मिळेल त्यावेळी मी याचठिकाणी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांच्या या विधानाची राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी खिल्ली उडवली आहे. तुम्ही मुख्यमंत्री नाहीत हे मनातून काढून टाका. विरोधी पक्षनेतेपदही तितकंच मोठं आहे, अशी कोपरखळी मलिक यांनी मारली आहे.

‘दोन वर्ष फिरत असताना मला असं वाटत नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी मुख्यमंत्रीच आहे असं मला वाटतं असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. मला वाटते दोन वर्ष झालीत, पण ते मुख्यमंत्रिपदाच्या मानसिकतेतून बाहेर पडताना दिसत नाहीत. विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत त्यांनी काम केले पाहिजे. ते मुख्यमंत्री नाहीत हे त्यांनी मनातून काढले पाहिजे. विरोधी पक्षनेतेपद सुद्धा मोठे आहे. ते पद मुख्यमंत्रिपदापेक्षा कमी नाही हे त्यांना कळलं पाहिजे, असा टोला मलिक यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या