मराठा समाजाच्या आंदोलनामुळेच सारथीला स्वायत्तता मिळाली- मधुकर पिचड

पिचड

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- एक मराठा, लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा देत काल मराठा समाजाने अकोले येथे मोठा मोर्चा काढला. मराठा समाजाने आंदोलन केल्यामुळेच सारथीला स्वायत्तता मिळाली.

अकोले तालुक्यात आज अभूतपूर्व असा मोर्चा निघाला. त्यामुळे आज शुभ दिवसाने सुरुवात झाली आहे. एका माळीचे नऊ व नऊचे नऊ लाख होतील व या आंदोलनाला बळकटी येईल, माझा मराठा आरक्षणाला व इतर सर्व मागण्यांसाठी जाहीर पाठिंबा असल्याचे माजी मंत्री मधुकर पिचड यांनी सांगितले आहे.

मधुकर पिचड पुढे म्हणाले की, फडणवीस सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाला काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज बांधवांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. मराठा, मुस्लिम आरक्षण मिळावे, यासाठी राणे समितीमध्ये काम करण्याचे भाग्य मिळाले, मात्र न्यायलयाने आरक्षण फेटाळल्याने दुःख झाले.

मात्र यापुढे संभाजीराजे यांच्या हाकेला ओ देऊन लाल महाल ते लाल किल्ला असे आंदोलन करून आरक्षण मिळवू, त्यासाठी सर्वांनी जागृत राहावे. एकमेकात भांडणे लावण्याचा प्रयत्न होईल, त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन हा प्रश्न निकाली काढल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. मराठा आरक्षणामुळे मराठा समाजाला न्याय मिळेल, असे पिचड म्हणाले.

तर प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज जनतेत बसले व भाषण न करताच निघून गेले. आपण पाठिंबा देण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सीताराम गायकर, रेश्मा गोडसे, अश्विनी काळे, अनिल झोलेकर, मराठा क्रांतीचे सुरेश नवले, मारुती मेंगाळ, दीपक महाराज देशमुख, बी.जे.देशमुख, निवृत्ती महाराज देशमुख, मधुकर नवले, शिवाजी धुमाळ, अशोक भांगरे, भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, काँग्रेसचे बाळासाहेब नाईकवाडी, शिवसेनेचे महेश नवले, मच्छिंद्र धुमाळ यांच्यासह मराठा समाजातील अनेक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या