नाथाभाऊ यांचे पक्ष सोडून जाणे दुर्दैवी ; पण भाजप हा व्यक्तीपेक्षा विचाराला महत्व देणारा पक्ष

जळगाव: नाथाभाऊ यांचं पक्ष सोडून जाणे तसं दुर्दैवी आहेच.पण भाजप हा व्यक्तीपुजेपेक्षा विचारांना महत्व देणारा पक्ष आहे म्हणून त्याचा एवढा फरक पडणार नाही असें मत जळगाव शहर विधानसभा मतदार संघाचे आमदार सुरेश भोळे उर्फ राजूमामा भोळे यांनी ‘महाराष्ट्र देशा’ सोबत बोलतांना व्यक्त केले.

भोळे पुढे म्हणाले की ‘नाथाभाऊ तर खूप मोठे नेते आहेत,एक साधा बूथ प्रमुख जरी पक्ष सोडून गेला तरी त्याचे पक्षाला दुखः असतेच.पण भाजप हा व्यक्तीपूजेपेक्षा विचारला महत्व देणारा पक्ष आहे, म्हणून कुणाच्या जाण्याने आणि कुणाच्या येण्याने पक्षाला कधीच फरक पडत नाही.

भारतीय जनता पक्षातून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात २३ ऑक्टोंबर रोजी मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पक्षप्रवेश केला होता.या कार्यक्रमाला उत्तर महाराष्ट्रातील अनेक नेते आणि खडसे समर्थक कार्यकर्ते आले होते.

नव्याने पक्षबांधणी : 

भाजपमधून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने आता उत्तर महाराष्ट्रात भाजपचे काय होईल ? हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून चर्चिला जात होता. पण यावर स्थानिक भाजप नेत्यांनीच आपल्या कृतीतून उत्तर दिले आहे.एकनाथ खडसे यांच्या होमपिच असलेल्या मुक्ताईनगरमध्येच भाजपची पक्षबांधणीसाठी गुरुवारी बैठक झाली.

या बैठकीला गिरीश महाजन मुंबईला गेल्यामुळे अनुपस्थित होते.पण तरीही एकमुखाने निर्णय घेण्यात आला की ‘गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली आता काम करायचे आणि तरुणांना पक्षात आवर्जून स्थान द्यायचे.

या बैठकीत भाजपचे प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक, संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे, खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे आदी मान्यवर यांसह ४० – ५० कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या