शाळा सुरू झाली तरी शाळेत येणे सक्तीचे नाही; मंत्री प्राजक्त तनपुरेंची माहिती!

तनपुरे

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या शाळा येत्या २३ नोव्हेंबरपासून सुरु होण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरवण्याचे नियोजन आहे.

मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने, शाळा उघडण्याबाबत अनेक जिल्ह्यात संभ्रम दिसत आहे. परंतु शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी मुलांना शाळेत येणे सक्तीचे नाही, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनी दिली आहे.

मुले घरी राहूनदेखील ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतात, अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. मंत्री तनपुरे अहमदनगरला पत्रकारांशी बोलत होते.

राज्य सरकारने शाळांबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर सोपवल्याने या संभ्रमात आणखी भर पडली आहे. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील सर्व शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र अन्य जिल्ह्यात शाळा सुरु होणार की नाही याबाबत संभ्रम आहे. दरम्यान, सरकारने जबाबदारी घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र एखाद्या ठिकाणी जास्त उद्रेक झाला, तर स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्यास सांगितल्याचे तनपुरे यांनी माहिती दिली आहे.

औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील शाळा ३ जानेवारीपर्यंत बंद राहतील असे, पालिका आयुक्तांनी सांगितले आहे. तसेच मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत.

याशिवाय ठाणे आणि पनवेलमधील शाळाही बंद राहणार आहेत. दरम्यान, पुण्यातील शाळाही १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या