मंगल कार्यालयांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी घेणे अनिवार्य

सोलापूर : लग्न कार्यासाठीचेखुले लाॅन्स, मंगल कार्यालयांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी घेतल्याशिवाय यापुढे व्यवसाय करता येणार नाही. त्या आदेशाची शहरातील मंगल कार्यालये, लॉन्स व्यवस्थापनास कल्पना नाही. प्रदूषण मंडळ त्याबाबत फारसे सतर्क नसल्याचे चित्र आहे. दिवाळीनंतर लग्नसोहळे सुरू होणार असल्याने त्यापूर्वीच संपूर्ण प्रक्रिया करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.

महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने २४ नोव्हेंबर २०१६ रोजी लग्न कार्यालये, लाॅन्स या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार लग्नासाठीचे खुले मंडप, लाॅन्स यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी घेतल्याशिवाय कुठेही व्यवसाय सुरू करू नये, असे हरित न्यायाधिकरणाने स्पष्ट केले. तुलसी विवाहानंतर शहर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लग्नसोहळ्यास सुरुवात होते. त्यानिमित्ताने कार्यालयांचे बुकिंगही सुरू झाले आहे. धूमधडाक्यात लग्नसोहळा करण्याची फॅशनही हल्ली रूढ होतीय. त्यानिमित्ताने ध्वनिक्षेपकाच्या मोठ्या भिंती उभारून वरात काढणे, कार्यालयात वाद्य, साउंडचा दणदणाट, फटक्यांची आतषबाजी असे प्रकार सर्रास दिसतात.

तसेच सोहळ्याच्या निमित्ताने विविध अन्नपदार्थांची मेजवाणी असते. शिल्लक राहिलेले अन्न, कार्यालयातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने प्रदूषणाचे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. शुभकार्याच्या निमित्ताने सभोवतालचे पर्यावरण बिघडवणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मंगल कार्यालयांसाठीचे नियम-अटी कडक केल्या. परवानगी घेणारी मंगल कार्यालये, लाॅन्स यांच्याविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी, तसेच अशी मंगल कार्यालये, लाॅन्स त्वरित बंद करावीत, असे आदेशही दिले. प्रशासनाकडे मंगल कार्यालयांची एकत्रित माहिती नाही. शहरामध्ये एकूण किती मंगल कार्यालये आहेत? त्यापैकी खासगी ट्रस्टची किती? या संदर्भातील सविस्तर माहिती महापालिका प्रशासनाकडेही नाही. त्याबाबतची माहिती संकलित करण्याचे काम पालिकातर्फे सध्या सुरू आहे.

Comments
Loading...