विजयाची घोडदौड सुरु ठेवणाऱ्या भाजपला बसू शकतो मोठा धक्का!

सर्वात मोठा मित्र पक्ष असणारा तेलगु देसम पडणार एनडीएमधून बाहेर

अमरावती (आंध्र प्रदेश): भारतीय जनता पार्टी लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील भाजपचा सर्वात मोठा मित्र पक्ष असणारा तेलगु देसम येत्या दोन दिवसांमध्ये एनडीएमधून बाहेर पडू शकतो, असे वृत्त आहे.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आंध्र प्रदेशवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली होती. या प्रश्नावर आंध्र अर्थमंत्री वाय. रामकृष्ण नायडू आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यात झालेल्या बैठकीत राज्याला विशेष दर्जा देण्याच्या मागणीवर कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे तेलगु देसम एनडीएमधून बाहेर पडण्याची राजकीय चर्चा सुरु आहे.

दिल्लीतील बैठक निष्फळ झाल्यानंतर पक्षाच्या आमदारांची नायडू यांनी मंगळवारी अमरावतीमध्ये बैठक घेतली. या बैठकीत बहुसंख्य आमदारांनी एनडीएमधून बाहेर पडावे असे मत मांडले आहे. आमदारांचा कौल समजल्यामुळे आता दोन दिवसांत नायडू टोकाचा निर्णय घेऊ शकतात.