94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तारीख सांगणे अशक्य, पण …

marathi samelan

नाशिक : नियोजित 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये मार्चमध्ये होणार होते. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सदरचे संमेलन स्थगित करण्यात आले होते. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे साहितय संमेलन घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रपरिषद घेतली.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘ कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर साहित्य संमेलन घेऊ. मात्र, आजच संमेलनाची तारीख सांगणे अशक्य आहे. परंतू संमेलन फार पुढे जाणार नाही याची दक्षता स्वागतमंडळ आणि लोकहितवादी मंडळ घेईल. त्या संदर्भात स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून साहित्य संमेलन लवकर घेता येईल याचा आम्ही प्रयत्न करू, असे ते म्हणाले आहेत.

तसेच ऑनलाईन संमेलन घेणे स्वागतमंडळाच्या विचाराधीन नसून, साहित्य संमेलनात वाचकांना पुस्तक खरेदी व प्रकाशक विक्रेत्यांना पुस्तक विक्रिचा लाभ घेता यावा तसेच लेखक-वाचकांच्या गाठीभेटी व्हाव्यात अशी साहित्य महामंडळाची व स्वागतमंडळाची निर्विवाद भूमिका आहे. त्यादृष्टीने हे संमेलन नेहमीप्रमाणेच व्हावे असा साहित्य महामंडळाप्रमाणेच स्वागतमंडळाचाही प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या