ओबीसी आरक्षण रद्द झाले हे भाजपचंच पाप ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

vijay waddetiwar

मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण चर्चेचा विषय बनले आहे. तसेच मराठा व ओबीसी समाजात सरकार विरोधात निराशेचे चिन्ह दिसत आहे. दोन्ही समाज आरक्षणासाठी मोर्चे, आंदोलन करत आहे. विरोधकांनी ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द होण्याला राज्य सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

तर आता मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणावरून भाजपवर निशाणा साधला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं ओबीसी आरक्षण रद्द झालं हे भाजपचंच पाप असल्याचा घणाघात वडेट्टीवार यांनी केला आहे. भाजपानं नीट भूमिका मांडली असती तर ओबीसींवर ही वेळ आली नसती असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘महाविकास आघाडी ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी काम करत आहे. राज्य सरकारमधले तीनही पक्ष ओबीसी आरक्षणासाठी काम करत आहेत. राज्य सरकारमार्फत आम्ही ओबीसींचा डेटा मिळवू आणि ओबीसी आरक्षण मिळवून देऊ’ असा विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केला.

दरम्यान आता ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारने इम्पेरीकल डेटा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीतील मंत्री करत आहेत. आता राज्य सरकारने इम्पेरीकल डेटा मिळवण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. ओबीसी वर्गाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी इम्पेरीकल डेटा मिळणे महत्वाचं असल्याची राज्य सरकारची भूमिका आहे.

महत्त्वाच्या बातम्या