‘साकीनाकाप्रकरणी डोळ्यांत अश्रू यावेत ही मनाची संवेदनशीलता पण नक्राश्रू ओघळू लागले की..’

sanjay raut

मुंबई: साकीनाका बलात्कारप्रकरणी राज्यभर संताप व्यक्त केला गेला. या घटनेविरुद्ध भाजपकडून ठाकरे सरकारवर निशाना साधला गेला. तर भाजपच्या चित्रा वाघ या घटनेवरून ढसाढसाच रडल्या. त्यांनी राज्यात कायद्याचा, पोलिसांचा धाक राहिला की नाही, असा सवाल ठाकरे सरकारला केला. तर सरकार अशा घटनेबाबत संवेदनशील नाही, असा आरोपही भाजपच्या नेत्यांनी केला. दरम्यान यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’ च्या अग्रलेखातून भाजपवर निशाना साधत पलटवार केला आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य आहे . विरोधकांनी साकीनाका बलात्कारप्रकरणी कितीही धुरळा उडवला तरी कायद्याच्या राज्यास तडा जाणार नाही . विरोधी पक्षनेते सांगतात त्याप्रमाणे त्या नराधमाला फाशीची शिक्षा होईल . कोणत्या विषयाचे व प्रकरणाचे राजकारण करायचे याचे भान ठेवायलाच हवे . साकीनाकाप्रकरणी डोळ्यांत अश्रू यावेत ही मनाची संवेदनशीलता आहे , पण नक्राश्रू ओघळू लागले की ,भीती वाटते. प्रकरणाचे गांभीर्य नष्ट होते. असे म्हणत त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर अप्रत्यक्ष निशाना साधला आहे.

तसेच या प्रकरणी संजय राऊत यांनी साकीनाक्यासारखी प्रकरणे ही एका भयानक विकृतीतून घडत असतात व जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात ही विकृती उफाळून येऊ शकते. हाथरस बलात्कार व हत्या प्रकरणाची तुलना साकीनाका घटनेशी केली जात आहे. ती सर्वस्वी चुकीची आहे. उलट साकीनाका प्रकरणात पोलिसांनी १० मिनिटांत आरोपीस गजाआड करून कायद्याचा धाक काय असतो ते दाखवून दिले. मुळात हे जे विकृत नराधम असतात त्यांना कायदा वगैरे काही कळत नाही. त्यामुळे ही विकृती दिसेल तेथे ठेचून काढणे हाच उपाय योग्य ठरतो. साकीनाक्यातील पीडित महिलेस दोन मुली आहेत. त्या निराधार झाल्या आहेत. त्या मुलींच्या शिक्षणाची व पुढची जबाबदारी राज्य सरकार घेत असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली हे सरकारच्या संवेदनशीलतेचे लक्षण नाही काय? असा सवाल संजय राऊत यांनी भाजपला केला आहे.

महत्वाच्या बातम्या :