रत्नागिरीत काम करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी गौरव : निलेश राणे

टीम महाराष्ट्र देशा : कोणतीही निवडणूक लढवली तर ती रत्नागिरीच्या जीवावर लढवेन आणि जिंकेन असा विश्वास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांनी चिपळूण येथे व्यक्त केला. जोपर्यंत रत्नागिरी आहे तोपर्यंत आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. रत्नागिरीत काम करणे हाच माझ्यासाठी गौरव आहे.

रत्नागिरीच्या सर्वांगिण विकासासाठी आपले सातत्याने प्रयत्न राहणार असून, शामराव पेजे महामंडळासाठी सरकारने १०० कोटीची तरतूद करावी यासाठी आपली आग्रही मागणी राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना निलेश राणे म्हणाले की, संपूर्ण जिल्ह्यात जीवंत पक्ष उभा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटले पाहिजे. राणेसाहेबांना अभिप्रेत असणारे काम आपण सर्वांनी केले पाहिजे. येत्या काळात आपण जेवढे काम करता येईल, तेवढे काम या जिल्ह्यात आपण करणार असून, सहकारी जोडत येणा-या प्रत्येक निवडणुकीला आपण सामोरे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदारसंघात चांगले वातावरण असून, या बदलत्या वातावरणाचा फायदा कार्यकर्त्यांनी करून घेतला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

गेली दहा ते बारा वर्षे आपण पाहतोय की, रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांचे राणेसाहेबांवरील प्रेम वेगळे आहे. अनेक भागातून, गावातील लोक राणेसाहेबांच्या संपर्कात आहेत. प्रत्येक भागात त्यांचे लोक आहे. त्यामुळे राणेसाहेब हे नेमके काय रसायन आहे ते अजूनही आपल्याला कळले नाही. ते समजण्याचा आपण प्रयत्न करतोय.

चिपळुणबाबतची आपुलकी वेगळी आहे. रस्ते कितीही खराब असले तरी, गाडी आपोआप इकडेच वळते, असे सांगून चिपळूण, रत्नागिरीशी आपले नाते वेगळे असल्याचेही ते म्हणाले. पक्षासाठी सर्वानी झटण्याची आवश्यकता आहे.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा कोकणी माणसाचा पक्ष आहे. त्यांच्या हक्काचा पक्ष आहे. हा पक्ष निलेश राणेंचा नसून, तो तुमचा पक्ष आहे. पक्ष स्थापन करताना साहेबांनी जे स्वप्न पाहिले आहे त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्यकर्त्यांनी झटून काम केले पाहिजे. पक्षाचा वापर समाजासाठी कसा होईल, असे काम कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. कार्यकर्त्यांने मनाचा मोठेपणा दाखवला तर पक्ष निश्चितच मोठा होईल, असा विश्वासही राणे यांनी व्यक्त केला.

गेली पाच वर्षे राणेसाहेब कॅबिनेटमध्ये नाहीत. आज २५ वर्षे कोकण विकासापासून मागे पडला. कोकणात आज अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या जवळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गाचे काम पूर्ण होते. मात्र, रत्नागिरी जिल्हा अजूनही मागे आहे. याठिकाणी केवळ झाडे तोडण्याचीच कामे सुरू आहेत. याला कारणही वेगळे आहे. सिंधुदुर्गमध्ये एका ठेकेदाराकडून महामार्गाचे काम सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पाच ते सहा ठेकेदार काम करत आहेत. हे ठेकेदार सर्व आमदारांचे आहेत. या आमदारांची घरे ठेक्यावर चालतात. त्यामुळे असे आमदार तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा काय विचार करणार, असा प्रश्नही निलेश राणे यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरेंनी माझ्यावर आरोप करू नये; अन्यथा मातोश्रीवरील गुपितं बाहेर काढेन – नारायण राणे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडेंना मोठे करत असल्याने प्रचंड नाराजी – नितेश राणे

महाराष्ट्र स्वाभिमान ‘किंगमेकर’ ठरणार

महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष नक्कीच किंगमेकरची भूमिका बजावेल, असा विश्वास निलेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेक नेते, आमदार, कार्यकर्ते साहेबांच्या भेटीस येत असतात. येणारी निवडणूक स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून लढवण्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात स्वाभिमान पक्षाची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संपूर्ण महाराष्ट्र माझा बालेकिल्ला – नारायण राणे