पुण्यात आयटी इंजिनिअरची पत्नी आणि मुलासोबत आत्महत्या

पुणे : बाणेर-पाषाण लिंक रोडवर एका आयटी इंजिनिअरने पत्नी आणि चार वर्षांच्या मुलासोबत आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नी आणि मुलाची हत्या करुन इंजिनिअरने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जयेशकुमार पटेल असे ३४ वर्षीय इंजिनिअरचे नाव, तर पत्नीचे नाव भूमिका पटेल (वय 30) आणि 4 वर्षीय मुलाचे नाव नक्ष आहे.जयेशकुमार पटेल हे आयटी इंजिनिअर होते. महिन्याला दीड लाख रुपये पगारावर ते एका नामांकित कंपनीत नोकरीस होते, तर पत्नी गृहिणी होती. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे घर आतून बंद होते. त्यामुळे शेजार्यांीनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रात्री 11 वाजता माहिती दिली. चतुरशृंगी पोलिसांनी धाव घेतली. दुसऱ्या इमारतीच्या बाल्कनीतून पोलिसांनी पटेल यांच्या घराजवळ पोहचले. दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी पोलिसांनी पूर्ण कुटुंब मृत्य अवस्थेत आढळून आले.

पती-पत्नीच्या गळ्याभोवती दोरीचे व्रण, तर मुलगा नक्ष याच्या तोंडातून फेस आला होता. त्यामुळे एकाच वेळी दोघांनी गळफास घेतला असावा किंवा पत्नीची व मुलाची हत्या करुन स्वत: आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांचे मृत्यदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.