कोणी कितीही भुंकले तरी फरक पडत नाही; कॉंग्रेस आमदाराचा शिवतारेंना टोला

vijay shivtare

पुणे : पुरंदर विमानतळामुळे सध्या महाविकास आघाडी मध्येच अनेक वाद-विवाद होत असताना पाहायला मिळत आहेत. काल शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पुरंदरचं प्रस्तावित विमानतळ बारामतीला हलवण्याचा डाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप करत असल्याचा आरोप केला होता.

याबाबत आज पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्याशी ‘महाराष्ट्र देशा’ने संवाद साधला असता त्यांनी माजी मंत्री शिवतारे यांच्यावर अनेक आरोप केले. “विजय शिवतारे यांना अर्धवट माहितीवर बोलण्याची सवय आहे. विमानतळ हे पुरंदर मध्येच आहे. आणि पुरंदरकरांच्या विकासासाठीच ते आहे. शिवतारे यांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनात केवळ शरद पवारांवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचेच काम केले. गेल्या १० वर्षांमध्ये शिवतारे यांचे पुरंदरसाठी काहीही योगदान नाही यामुळे कोणी कितीही भुंकले तरी मला काहीही फरक पडत नाही.” असा घणाघात आमदार संजय जगताप यांनी शिवतारे यांच्यावर केला.

“महाविकास आघाडी म्हणून जरी राज्यामध्ये आम्ही एकत्रित असलो तरी शिवतारे यांची वैचारिक पातळी योग्य नाही त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याची इच्छा नाही. मला लोकांनी चांगले काम करण्यासाठी निवडून दिले आहे. मला विधानसभेमध्ये पाठवून, आमदार करून लोकांनी जबाबदारी दिली आहे आणि मी केवळ लोकांसाठी व शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे ” असेही त्यांनी सांगितले. या सगळ्या वादामुळे आगामी काळात पुरंदर विमानतळामुळे महाविकास आघाडीमध्ये वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

महत्वाच्या बातम्या