मोदी क्रांतिकारी नेते- नेतान्याहू

इस्रायलच्या पंतप्रधानांची मोदींवर स्तुतिसुमने

टीम महाराष्ट्र देशा-  नरेंद्र मोदी हे क्रांतिकारी नेते असून त्यांनी भारतात क्रांती घडवली अशा शब्दात इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. इस्रायलचे पंतप्रधान सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून सोमवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी नऊ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. सायबर सहकार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांमधील करारांचा यात समावेश आहे. यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

काय म्हणाले नेतान्याहू ?

नेतान्याहू यांनी देखील मोदींचे कौतुक केले. मोदी हे क्रांतिकारी नेते असून त्यांनी माझे ज्या पद्धतीने स्वागत केले त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. भारतीय जवानांनी इस्रायलसाठी बलिदान दिले. मोदी हे इस्रायलमध्ये येणारे पहिले पंतप्रधान असून त्यांचा इस्रायल दौरा एखाद्या रॉक कॉन्सर्टपेक्षा कमी नव्हता, असे नेतान्याहू यांनी सांगितले.

भारतातही ज्यू आहेत. ज्यू लोकांना भारतात नेहमीच प्रेम आणि आदर मिळाला, यातून भारताच्या लोकशाहीचे आणि धर्मनिपक्षतेचे दर्शन घडते, असे त्यांनी सांगितले. भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश दहशतवादाने पीडित आहेत. दहशतवादाविरोधात आम्ही भारतासोबत आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.